शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात 140 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 140 कोटी 13 लाख 64 हजार 480 रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. हा पहिला हप्ता वाटप करण्यासाठी तालुकानिहाय तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला असून, त्यानंतर हे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा अल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला होता. त्यामुळे दुष्काळाने बाधीत झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नगर जिल्ह्यात 280 कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के अनुदानाची रक्कम म्हणजेच 140 कोटी 13 लाख 64 हजार 480 रुपये प्राप्त झाले आहेत. दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांचा तालुकानिहाय आढावा घेऊन त्यानुसार हे अनुदान तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यासाठी 12 कोटी 12 लाख, पारनेर तालुक्यासाठी 12 कोटी , नगर 9 कोटी 98 लाख, शेवगाव 15 कोटी 19 लाख, पाथर्डी 17 कोटी 71 लाख, राहुरी 16 कोटी 56 लाख, नेवासा 12 कोटी, राहाता 7 कोटी 76 लाख, संगमनेर 20 कोटी 95 लाख, श्रीगोंदा 4 कोटी, कर्जत 7 कोटी 43 लाख, कोपरगाव 2 कोटी 60 लाख व श्रीरामपूर तालुक्यासाठी 1 कोटी 58 लाख रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे. आता हे अनुदान थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

मिळालेले आनुदान पुढील प्रमाणे- शेतीपिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकर्‍यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम दोन हप्त्यांत दिली जाणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता सहा हजार 800 रुपये प्रती हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजेच 3 हजार 400 रुपये प्रती हेक्टर किंवा किमान एक हजार रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना प्रथम हप्त्यापोटी 18 हजार रुपये प्रती हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजेच 9 हजार रुपये प्रती हेक्टर किंवा किमान दोन हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम देण्यात येणार आहे.