
सामना प्रतिनिधी । उरण
माघी गणेशोत्सवानिमीत्त चिरनेर येथिल प्रसिद्ध महागणपतील मंदिरात महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त चिरनेर येथील प्रसिद्ध महागणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
चिरनेरचा महागणपती हा नवसाला पावणारा असल्याची भक्तांची भावना असल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे व परिसरातील अनेक गणेश भक्त येथे दर्शनाला येतात. चिरनेरचे हे महागणपती मंदिर पेशवे कालीन असून पेशव्यांचे सुभेदार रामजी फडके यांच्या स्वप्नात दृष्टांत देऊन मी तळ्यात पडलेला असून माझी प्रतिष्ठापना करावी असे सांगितले. त्यानंतर तळ्यातून ही मूर्ती काढण्यात आली अशी अख्यायिका आहे. अखंड पाषाणातील या मूर्तीची उंची 7 फूट आणि रूंदी साडेतीन फूट आहे. ही मुर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या उजवीकडील हातात परशू आहे. तर दुसरा हाताने आशिर्वाद देत आहेत. डाव्या बाजूच्या वरच्या हातात पाश आहेत तर दुसऱ्या हातात मोदक आहे. डोक्यावर मुकुट असून या गणेशाची सोंड डावीकडे आहे. म्हणजे ऋद्धी विनायक आहे. ही मूर्ती तिळातिळाने वाढते अशी अख्यायिका आहे. या गणेश मंदिराला श्रीमंत पेशव्यानी भेट देऊन महागणपतीची पूजा केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतो.
पहाटे तीन वाजल्यापासून महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. पालख्या, दिंड्या घेऊन परिसरातील भक्त गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. गणेशोत्सवानिमित्त मोठी जत्रा येथे भरली होती. विविध प्रकारच्या दुकानांनी परिसर गजबजून गेला होता. गणेशोत्सवानिमीत्त मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, अभिषेक, किर्तन, भजन असे कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आले होते. यानंतर रात्री महागणपतीची पालखी चिरनेर गावातील सात पाड्यात फिरवून या उत्सवाची सांगता करण्यात आली.































































