
सामना प्रतिनिधी । नांदेड
समस्त नांदेडकरांच्या वतीने आज हनुमानपेठ (वजिराबाद चौक) येथे अवंतीपूरच्या दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव हे यावेळी मुद्दामहून उपस्थित होते. शिवसेना सोशल मिडीयाचे प्रमुख गौतम जैन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुलवामाकडे निघालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी काल हल्ला केला होता. त्या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले होते. या सर्व शहीदांना आज नांदेडकरांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. वजिराबाद चौकात सायंकाळी पाच वाजल्यापासून नांदेड शहरातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहीदांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली अर्पण केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्या शहीदांच्या वीर मरणामुळे सबंध देशात संतापाचे वातावरण आहे. अशावेळी सर्वांनी शांततेने व संयमाने राहिले पाहिजे. या वीर जवानांना मी श्रध्दांजली अर्पण करतो, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी राजश्री हेमंत पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर, सिडकोचे शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड, अवतारसिंह पहरेदार, निकिता शहापूरवाड, भाजपाचे संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, ललिता कुंभार, रामनारायण बंग यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते. उद्या नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले असून, सर्वांनी शांततेने हा बंद पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले. स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी सर्व बसेस बंद ठेवून श्रध्दांजली अर्पण केली. नांदेडकरांनी श्रध्दांजली अर्पण करुन आपणही वीर जवानांच्या पाठिशी आहोत, हा संदेश दिला आहे.


























































