भक्तिमय वातावरणात माणगांवात श्री सौर दत्तयाग कार्यक्रमाची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

गेले चार दिवस माणगांव दत्त मंदिरात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत दिगंबरा…दिगंबरा…च्या नामजपात श्री सौर दत्तयाग उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहील्यामुळे माणगांव दत्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.

प्रतिवर्षी प्रमाणे माणगांव दत्त मंदिरात श्री सौर दत्तयागानिमित्त भक्तांनी चार दिवस आधी पासूनच उपस्थिती दर्शविली होती. नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्षवेधी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. एकूणच आलेल्या भक्तांना कोणत्याच प्रकारची गैरसोय होवू नये याची परिपूर्ण खबरदारी विश्‍वस्त मंडळ व आयोजकाच्यावतीने घेण्यात आली होती. गेले चार दिवस दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम,सकाळी आरती,दुपारी महाप्रसाद,सायंकाळी पालखी सोहळा तसेच भजन,किर्तन असे भरगच्च कार्यक्रम शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विशेष म्हणजे सुप्रसिध्द पार्श्‍व गायक रवींद्र साठे यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला.

शेवटच्या दिवशी यागाच्या पूर्णाहुती कार्यक्रमाला भाविक-भक्तांची मोठी उपस्थिती राहीली. स्थानिक पोलिसांनी वाहनांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेवून त्या प्रकारे नियोजन केले होते. एकूणच भक्तीमय वातावरणात माणगांव दत्त मंदिर येथील श्री सौर दत्तयाग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. माणगांव शिवसेनेच्यावतीने या कार्यक्रमाला येणार्‍या भाविकांना मोफत सरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले. दरम्यान गुरूवारी माणगांव दत्तमंदिर येथे सौर दत्तयाग सोहळ्यास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरूवारी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात सुरु असलेल्या पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक सहभागी झाले.

यावेळी जि. प. सदस्य राजू कविटकर , विभाग प्रमुख बबन बोभाटे, पं स. सदस्या सौ. शरयू घाडी, उपविभाग प्रमुख रमाकांत धुरी, दीपक आंगणे, आप्पा मुंज, रुपेश नानचे, अमर घाडी , अजित करमलकर, शैलेश विरनोडकर, रोशन भिसे आदींसह शिवसैनिक व भक्तगण उपस्थित होते.