
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत मोठा हिंसाचार घडवून 100 नागरिकांचे बळी घेण्यात आले होते. त्यामुळे या राज्याला अतिसंवेदनशील ठरवून तिथे निवडणूक काळात केंद्रीय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) नियुक्त करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी निवडणूक आयोगाकडे केली. भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आपले निवेदन दिले.
पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे या राज्यात स्थानिक पोलिसांच्या सुरक्षेखाली निवडणुका घेऊ नयेत. इथे सीआरपीएफची नियुक्ती करण्यात यावी असे प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मतदान प्रक्रियेवर या घटनांचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता आम्ही निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणी केली आहे. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान माध्यमांवरही अघोषित बंदी असते, मात्र निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी माध्यमांनाही इथे प्रवेश मिळावा अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या विरोधातही तक्रार
भाजपने निवडणूक आयोगाकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांच्या विरोधातही तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांविरोधात खोटे आरोप लावले आहेत. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. मंगळवारी अहमदाबाद येथे निवडणूक प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

























































