
सामना ऑनलाईन, पालघर
पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकला. युतीच्या शिलेदारांनी 28 पैकी 21 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेचे 14 तर भाजपचे 7 नगरसेवक विजयी झाले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी अशी मोट बांधलेली महाआघाडी तोंडघशी पडली. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले, मनसे, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. नगर परिषदेत सर्वात मोठा पक्ष शिवसेना ठरला. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. उज्ज्वला काळे विजयी झाल्या. त्यांनी युतीच्या डॉ. श्वेता पाटील यांचा निसटता पराभव केला.
पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी 24 मार्च रोजी मतदान झाले. आज 25 मार्चला सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने युतीने आपल्या विजयाचे खाते निकालाआधीच उघडले होते. युतीचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून येणार हे चित्र स्पष्ट होते. यंदा प्रथमच नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान झाले. नगराध्यक्षपदासह 29 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 91 उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. शिवसेना 19, भाजप 9 असे युतीचे 28 शिलेदार तर नगराध्यक्षपदासाठी डॉ. श्वेता पाटील निवडणूक रिंगणात होते. 19 पैकी शिवसेनेचे एकूण 14 नगरसेवक विजयी ठरले. भाजपचेही पहिल्यांदाच सात नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने पालघर नगर परिषदेत आपला गड राखला असून युतीचे सर्वाधिक 21 नगरसेवक विजयी झाले आहेत. पाच अपक्षही जिंकून आले. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या महाआघाडीला पालघरकरांनी साफ झिडकारले. राष्ट्रवादीचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि मनसेला आपले खातेही उघडता आले नाही.
श्वेता पाटील यांचे नगराध्यक्षपद थोडक्यात हुकले
शिवसेना-भाजप युतीचे नगराध्यक्षपद थोडक्यात निसटले आहे. युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. उज्ज्वला काळे यांनी अवघ्या एक हजार मतांनी पराभव केला. डॉ. काळे यांना 13,974 तर पाटील यांना 12,904 मते मिळाली.
विजयी नगरसेवक
नगराध्यक्षा – डॉ. उज्ज्वला काळे (राष्ट्रवादी)
- प्रभाग क्र. 1 -अ- दिनेश बाबर (अपक्ष), ब- शेरबानू मेमन (अपक्ष)
- प्रभाग क्र. 2- अ- प्रियंका म्हात्रे (शिवसेना),ब- रवींद्र म्हात्रे (शिवसेना)
- प्रभाग क्र. 3- अ- मोना मिश्रा (भाजप), ब- तुषार भानुशाली (शिवसेना)
- प्रभाग क्र. 4- अ- कविता जाधव (अपक्ष), ब- प्रवीण मोरे (अपक्ष)
- प्रभाग क्र. 5- अ- दिनेश घरट (शिवसेना),ब- हिंदवी पाटील (राष्ट्रवादी)
- प्रभाग क्र. 6- अ- कैलास म्हात्रे (शिवसेना, बिनविरोध), ब- लक्ष्मीदेवी हजारी (भाजप)
- प्रभाग क्र. 7- अ- राजेंद्र पाटील (शिवसेना),ब- अलका राजपूत (भाजप)
- प्रभाग क्र. 8 – अ- चंद्रशेखर बडे (शिवसेना), ब- शिल्पा बाजपेयी (राष्ट्रवादी)
- प्रभाग क्र. 9- अ- अनुजा तरे (शिवसेना),ब- प्रथमेश पिंपळे (अपक्ष)
- प्रभाग क्र. 10 -अ- गीता पिंपळे (भाजप), ब- अक्षय संखे (शिवसेना)
- प्रभाग क्र. 11 -अ- चेतना गायकवाड (शिवसेना),ब- भावानंद संखे (भाजप)
- प्रभाग क्र. 12- अ- राधा मानकामे (शिवसेना), ब- सुभाष पाटील (शिवसेना)
- प्रभाग क्र. 13- अ- अनिता किणी (भाजप), ब- अमोल पाटील (शिवसेना)
- प्रभाग क्र. 14- अ- उत्तम घरत (शिवसेना), ब- रोहिणी अंबुरे (भाजप)































































