शरद पवार कसले शेतकऱ्यांचे कैवारी ते तर कारखानदारांचे नेते : अॅड. प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शेवगाव

शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करून त्यांना देशोधडीला लावणारे शरद पवार हे शेतकर्‍यांचे नव्हेत तर ते कारखानदारांचे नेते आहेत. ते कसले शेतकऱ्यांचे कैवारी अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शेवगाव येथील जाहीर सभेत शुक्रवारी केली. ते वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अरुण जाधव अनिल बोरुडे प्यारेलाल शेख, विजय बोरुडे, प्रकाश वाघमारे, प्रकाश बापू भोसले, अशोक सोनवणे, गोपीचंद पडळकर, प्रा.लक्ष्मण माने, सुधाकर आव्हाड, संजय सुखदान आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.किसन चव्हाण यांनी केले.

आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, देशात गेल्या सत्तर वर्षात कोणतेच मूलभूत प्रश्न सुटू शकलेले नाहीत सुटू शकलेले नाहीत. त्याला जबाबदार असणारी पूर्व काँग्रेसची सरकारे आणि आता या पाच वर्षातील मोदी सरकार कारणीभूत असून त्यांनी लोकांना भूलथापा देऊन फसवले. जातीपातीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न बाजूला ठेवत त्यांना आपली व्होट बँक बनवली. मुस्लिम समाज काँग्रेसचा हक्काचा मतदार झाला आहे. त्यांनी आता काँग्रेसला धुडकावून वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यांनी विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. बीजेपी ला विरोध करतानाच शरद पवारांसारख्या संधीसाधू लोकांना सत्तेपासून रोखले पाहिजे. आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे फक्त शरद पवार यांच्यामुळेच झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर अनेक सभेत घणाघाती टीका केली. त्यावर मात्र महाराष्ट्राचे जाणते राजे शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामागचे कारण काय, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीवाल्यांना नगरचे आमदार संग्राम जगताप हेच उमेदवार म्हणून दिसले, त्यांना इतर समाजातील तसेच अन्य सामान्य व्यक्ती दिसला नाही असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसला घेरले. अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा नगरसेवक तर भाजपचे नऊ नगरसेवक असूनही याठिकाणी भाजपची सत्ता राहिली यावरून सिद्ध होते की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला छुप्या पद्धतीने मदत करून इतरांना सत्तेच्या सारीपाटापासून दूर ठेवते. उद्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार ते पाच खासदार निवडून आले तरी ते नरेंद्र मोदी यांनाच सहकार्य करतील असा घणाघाती आरोप केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानाद्वारे कायद्याच्या कक्षेत बसवले पाहिजे. त्यांचे चाललेले उद्योग हे बंद करावे लागतील. त्यांच्यामुळेच दलित आणि मुस्लिमवर या देशात अन्याय अत्याचार वाढले असा आरोपही त्यांनी केला तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा ऍक्सीडेन्ट कशामुळे झाला आणि त्यांच्या मृत्यूची चौकशी का होऊ शकली नाही हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. त्याचा छडा लावायला हवा. मुंडे भगिनी सुद्धा कोणाच्यातरी दबावाखाली असल्याचे दिसते. संविधान नसते तर गोपीनाथ मुंडे कदापिही उपमुख्यमंत्री झाले नसते दबावाचे राजकारण उध्वस्त करायचे असेल तर ही आयती संधी आहे देशातील घराणेशाही संपवा असे आवाहन करीत 23 एप्रिल ला वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना भरघोस मते देऊन बदल घडविण्याचे आवाहन ॲड.आंबेडकर यांनी केले. आभार प्रकाश बापू भोसले यांनी मानले.