परप्रांतीय व्यवसायिकांविरोधात स्थानिकांचा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

परप्रांतीय व्यापार्‍यांमुळे भविष्यात स्थानिक व्यावसायिकांना त्रास होणार आहे. त्यासाठी स्थानिक सर्व व्यावसायिकांनी संघटीत होणे आवश्यक आहे. असा सूर सोमवारी पिंगुळीत झालेल्या विविध व्यवसाय संघटनांच्या बैठकीत उमटला. या बैठकीत परप्रांतीय व्यावसायिकांच्या आस्थापनांना स्थानिक व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शवत आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सर्व व्यापार्‍यांनी एकत्र या, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

पिंगुळी ग्रामपंचायत हॉल येथे सोमवारी केमिस्ट असोसिएशन, टेलरिंग असोसिएशन, नाभिक संघटना, मोबाईल असोसिएशन, पिंगुळी व्यापारी संघटना व कुडाळ तालुका टू व्हिलर मॅकॅनिक संघटना यांच्या अध्यक्षांची सामायिक बैठक पार पडली. या बैठकीत परप्रांतीय व्यापारामुळे स्थानिक व्यावसायिकांना होणार्‍या त्रासाबद्दल व भविष्यातील समस्या या बद्दल चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध मुद्द्यांबद्दल विचार विनिमय करण्यात आला. यात आज पर्यंत व्यापार्‍यांच्या व्यापारातील आक्रमणा बद्दल सर्व व्यापार्‍यांनी संघटित होण्याची गरज आहे, अशी भावना यावेळी व्यापार्‍यांमधून व्यक्त करण्यात आली. यामध्ये परप्रांतीय व्यापार्‍याची मोबाईल फ्रेंचायसी होऊ घातली आहे. गेले पाच महिने याविरुद्ध स्थानिक व्यापारी लढा देत आहेत. याबद्दल आम्ही व्यापारी व्यापारी संघटनेकडे वारंवार जाऊन व निवेदने देऊन देखील आम्हाला पाठिंबा मिळाला नाही. या विषयाबद्दल तीन महिन्यापूर्वी व्यापारी पतसंस्थेत झालेल्या बैठकीमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे आणि व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशटे यांनी स्थानिकांच्या विरोधात असेल तर अशी कोणतीही फ्रेंचायसी कुडाळ मध्ये होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली व त्याबद्दल तोडगा काढण्यासाठी पंधरा दिवसात व्यापारी मेळावा घेऊन निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले होते. पण आता तीन महिने उलटूनही त्याबद्दल कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. व्यापारी संघटनेच्या परवानगीशिवाय अशी कोणतीही मोबाईल फ्रें चायसी कुडाळ येथे येणार नाही असे आश्‍वासन देऊन सुद्धा त्यांचे काम कुडाळ येथे सुरू झाले आहे. याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. व्यापारी संघटना स्थानिक व्यापार्‍यांचा विचार करत नसेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी खंतही व्यापार्‍यांनी यावेळी बोलून दाखवली.

आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. व्यापार्‍यांनो जागे व्हा सगळे एकत्र या आज ही वेळ आमच्यावर आली आहे उद्या ती वेळ तुमच्यावर येऊ शकते व्यापरानो जागे व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला केमिस्ट संघटना अध्यक्ष अभय नाईक, नाभिक संघटना अध्यक्ष नितेश पिंगुळकर, कुडाळ तालुका टू व्हिलर मॅकॅनिक संघटना अध्यक्ष आनंद पेडणेकर, पिंगुळी व्यापारी संघटना अध्यक्ष सूनील म्हापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे,सल्लागार बबलू पिंगुळकर,साहिल शिरसाट,तानाजी चव्हाण, योगेश तवटे व इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.