
सामना ऑनलाईन, मुंबई
निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना युतीची प्रेरणा बाळासाहेब ठाकरेच होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण होत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताकरिता आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढू, जनतेच्या दरबारात जाऊन काम करू, मोदींनी देशात रुजवलेली विश्वासाची परंपरा महाराष्ट्रातही रुजवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
युती होताना समोर आलेले सर्व मुद्दे कायम असून त्यावर कामही सुरू असल्याचे ते म्हणाले. युतीमध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला दुरावा दुर्दैवी होता हेदेखील मुख्यमंत्र्यांनी कबूल केले. मात्र यातून आपण धडा घेतला असून अशा चुका पुढे होऊ दिल्या जाणार नाहीत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे आपले मोठे भाऊ असून उद्धव यांचे मोठे भाऊ मोदी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पराभव लपवण्यासाठीची विरोधक ‘ईव्हीएम’ मशीन, मतांमध्ये फूट पाडल्याची कारणे पुढे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यांनी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे असेही ते म्हणाले.
काँग्रेस-विरोधी पक्षांची लागली वाट!- आठवले

आजही देशामध्ये पाहायला मिळाली नरेंद्र मोदींची लाट,म्हणूनच काँग्रेस आणि विरोधी पक्षांची लागली आहे वाट!आज माझी उद्धवजी आणि मुख्यमंत्र्यांबरोबर झाली आहे गाठ आता मी अजिबात लवकर सोडणार नाही त्यांची पाठ!
आता दुष्काळाच्या कामाला लागू! उद्धव ठाकरे यांचे उद्गार
एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास आपण निकालाआधीच व्यक्त केला होता. त्यानुसार जाहीर झालेल्या निकालावरून जनतेची साथ ‘एनडीए’लाच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनतेला साष्टांग दंडवत घालत असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आता निवडणुका झाल्या. त्यामुळे मिळालेल्या विजयाचा आनंद साजरा करून आता लगेचच दुष्काळाच्या कामाला लागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आशीर्वादही घेतले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार, युवासेनेचे वरुण सरदेसाइ, माजी आरोग्यमंत्रीदीपक सावंत आदी उपस्थित होते.
पुढील सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार
जनतेचा महायुतीवर विश्वास असल्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा मोदी भाईंच्या नेतृत्वाखालचे सरकार निवडून दिले. ‘मोदी है तो मुमकीन है’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ही महायुती केवळ आगामी विधानसभेसाठीच नव्हे तर पुढील सर्व निवडणुकांसाठी कायम राहणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांचेही आभार मानताना केवळ टीकेसाठी टीका न करता साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मोदींची भेट घेणार
‘एनडीए’ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फोन करून अभिनंदन केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मोठय़ा विजयाच्या पार्श्वभूमीवर लवकरच मोदींची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. कुणाच्या पराभवाबद्दल बोलणार नसल्याचे सांगताना जिंकलेल्या सर्वांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले.
राममंदिर तर होणारच!
अयेध्येत राममंदिर व्हावे यासाठी शिवसेना आधीपासूनच आग्रही असून यापुढेही हीच भूमिका राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. राममंदिराचा मुद्दा महायुतीच्या जाहीरनाम्यात असून शिवसेना यापुढे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
26 मे रोजी सरकार स्थापनेचा दावा करणार
भारतीय जनता पार्टीचे नेते 26 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत भाजपाच्या कार्यालयात जातील. यावेळी मोदी यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक बडे नेते आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहातील. यादरम्यान मोदी भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत.


























































