
सामना ऑनलाईन, मुंबई
संत ज्ञानेश्वर, कुंकू, शेजारी, पडोसी, संत तुकाराम, अयोध्येचा राजा, सैरंध्री, सिंहगड, अमृतमंथन, धर्मात्मा अशा अभिजात चित्रपटांच्या निर्मितीने सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेला शनिवार, 1 जून रोजी 90 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रभात फिल्म कंपनीच्या गौरवशाली वाटचालीचा मागोवा.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेलेल्या प्रभात पर्वची सुरुवात कोल्हापूर येथे पार्वतीबाई दामले यांनी 1 जून 1929 रोजी मंगल कलश ठेवून केली. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. दामले-फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबर एकत्रित झाले आणि ‘प्रभात’ची स्थापना 1 जून 1929 रोजी कोल्हापुरातील मंगळवारपेठेत झाली. सीतारामपंतांनी भांडवल दिले .
1929 ते 1932 मध्ये प्रभातकारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली, तर 1932 साली ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाची निर्मिती केली. आजमितीस हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. 1934 साली प्रभातचे पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झाले. दामले यांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्या काळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ची ख्याती होती. 1932 ते 1934 दरम्यान ‘प्रभात’ने सहा बोलपटांची निर्मिती केली. 1934 ते 1957 हा ‘प्रभात’चा पुण्यातील कालखंड. त्यादरम्यान 26 बोलपटांची निर्मिती झाली. 1957 साली ‘प्रभात’च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे हक्कही विकले गेले. त्यामुळे प्रभातचे चित्रपट बघणे मुश्किल झाले. 1969 साली अनंतराव दामले यांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगावी प्रभातचे चित्रपट दिसू लागले.
फिल्म ऍण्ड टीव्ही इन्स्टिटय़ूट
1957 साली प्रभात कंपनी बंद झाली. 1957 ते 1959 या काळात एस. एच. केळकर यांनी प्रभात चालवली.पुढे 1961 साली सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म ऍण्ड टीव्ही इन्स्टिटय़ूट’ची स्थापना झाली.
गौरवशाली पाऊलखुणा
- 1930 – बालकलाकारांची प्रमुख भूमिका असणारा ‘बजरबट्टू’ हा पहिला चित्रपट.
- 1932 – मराठीतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा.’
- 1933 हिंदुस्थानातील पहिला रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’ची निर्मिती.
- ‘संत तुकाराम’ चित्रपटांने अनेक विक्रम केले. सलग 57 आठवडे हा चित्रपट चालला.
- 1937 साली ‘कुंकू’ चित्रपटातील एका गाण्यात पार्श्वसंगीताचा वापर न करता गाणे चित्रित केले.
- 1939 साली ‘माणूस’ चित्रपटात बहुभाषिक गाणे चित्रित केले. हासुद्धा पहिलाच प्रयोग होता.
- 1941 साली ‘संत ज्ञानेश्वर’ अमेरिकेत प्रदर्शित झाला.























































