गोव्यातही काँग्रेसला हादरा बसणार? 4 आमदार भाजपच्या संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-logo

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यामध्ये काँग्रेसचे 4 आमदार हे भाजपच्या वाटेवर आहे. हा खुलासा काँग्रेसच्याच एका आमदाराने केला आहे. क्लाफासियो डायस असं या आमदाराचे नाव असून ते कुंकळ्ळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या समर्थकांनी पाठिंबा दिल्यास आपणही भाजपमध्ये जायला तयार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

गुरुवारी डायस यांनी कुंकळ्ळी येथे त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या सभेत बोलत असताना डायस म्हणाले की “काँग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकास कामांमुळे अस्वस्थ आहेत.मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार  भाजप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत” या बैठकीमध्ये डायस यांनी भाजपमध्ये आपण प्रवेश केल्यास कार्यकर्ते कसा प्रतिसाद देतील याची चाचपणी करून पाहिली. डायस यांनीबैठकीत बोलताना म्हटले की आपल्या समर्थकांना आपण काँग्रेस पक्ष सोडलेला नको असल्यास आपण त्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाही असे डायस स्पष्ट केले आहे. डायस यांनी भाजपत जावं किंवा जाऊ नये याबाबत त्यांच्या समर्थकांनी संमिश्र मते व्यक्त केली.

डायस हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. याबाबत डायस यांनी बोलताना म्हटले की मला अजून भाजपची ऑफर आलेली नाही. विरोधी पक्षात बसल्याने आपल्याला बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवून देता येत नाही असं डायस यांचे म्हणणे आहे. गुरुवारच्या बैठकीनंतर डायस यांना पत्रकारांनी पुन्हा एकदा भाजपप्रवेशाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की निर्णय घेण्यासाठी ते पुन्हा एकदा समर्थकांशी चर्चा करणार आहेत.