मालवण कातवड येथे साकव कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोर केल्याने मालवण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. कातवड धुरीवाडी येथील साकव मुसळधार पावसामुळे कोसळला. तर सर्जेकोट येथील लक्ष्मी धर्माजी आरोलकर या महिलेच्या घरावर पहाटे फणसाचे झाड कोसळून नुकसान झाले. मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, आज सायंकाळ पर्यंत मालवण शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरुच होती. सकाळी ८ वाजेपर्यंत मालवणात ५९ मिमी एवढा पाऊस झाला.

मालवण शहरात सकाळपासुन कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. आडारी रोड भागात पावसाचे पाणी साचल्याने काही घरांना धोका निर्माण झाला होता. याबाबत नागरिकांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह आरोग्य सभापती पंकज सादये, नगरसेवक दिपक पाटकर, यांचे लक्ष वेधले. नगरपालिकेचे ठेकेदार महेश गिरकर यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. मात्र, रस्त्यावरील मोरीच काही प्रमाणात कोसळल्याने पाण्याला वाट मिळत नव्हती. त्यामुळे या ठिकाणी नवीन मोरी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तातडीने नवीन मोरी बसविण्यात आली आहे. कातवड येथेसाकव कोसळला त्यामुळे ग्रामस्थांची अधिक पायपीट होणार आहे.