चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

मुळा नदीपात्रातील वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा करून भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टरच्या धडकेने राहुरीच्या खाटीक गल्लीतील सलीम पठाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या घटनेने राहुरीच्या महसुल प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.

सोमवार १ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी रस्त्यावर वाळूच्या ट्रॅक्टरखाली सापडून सलीम पटेल हे गंभीर जखमी झाले होते. वाळूने भरलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या अपघातानंतर सलीम यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. माञ त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताच्या घटनेनंतर अज्ञात वाळू तस्कराने घटनास्थळावरून वाहनासह धूम ठोकली. आज मंगळवारी दुपारी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर सलीम पठाण यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

राहुरी शहरातील नावघाट, गणपती घाट कासार पानथा, तनपुरे वाडीसह मुळा व प्रवरा नदीपात्रातील बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयाच्या आवारात वाळूची तस्करी तसेच दलाली करणा-यांचा कायमच वावर असल्याने दोन नंबर व्यवसाय करणारे चांगलेच निर्ढावलेले आहेत. अपघाताच्या या घटने बाबत राहुरी पोलिसात आकस्मात गुन्ह्याची नोंद केली आसुन पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार डी. बी. जाधव करीत आहेत.

मुळा नदीपात्रातील वाळूचा रात्रंदिवस चोरट्या मार्गाने उपसा सुरू असताना राहुरीच्या महसुल अधिका-याचे होणारे दुर्लक्ष संशयास्पद ठरले आहे.