
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
370 कलमामुळे जम्मू-कश्मीरात दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही, भ्रष्टाचारालाच आजवर खतपाणी घातले गेले. पाकिस्तानने 370 कलमाचा वापर शस्त्रासारखा केला, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विकासच जम्मू-कश्मीरातील दहशतवादाचा नायनाट करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविण्यात आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले आणि देशवासीयांशी संवाद साधला. 40 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 370 कलमामुळे जम्मू-कश्मीरच्या जनतेचा काय फायदा झाला, असा सवाल करीत या कलमामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. या कलमामुळे जम्मू-कश्मीरात भ्रष्टाचार, दहशतवाद, घराणेशाही, फुटीरतावाद वाढला, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान काय म्हणाले?
- 370 कलम हटवल्यामुळे कोटय़वधी देशवासीयांचे स्वप्न साकार झाले आहे.
- जम्मू-कश्मीरच्या विकासातील अडथळा आता दूर झाला आहे. विकासच दहशतवादाचा नायनाट करेल असा मला विश्वास आहे.
- घराणेशाहीने कश्मिरी तरुणांना पुढे येऊ दिले नाही. हे तरुणच आता घराणेशाही संपवतील.
- जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्याने विकास होईल. कश्मीरमध्ये तंत्रज्ञानावर भर देऊ. बॉलीवूडच नाही तर हॉलीवूड सिनेमांचे चित्रीकरण येथे होईल.
- जम्मू-कश्मीरात खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. शिक्षणाच्या अधिकारापासून मुलींच्या कल्याणाच्या योजना राबविल्या जातील.
- जम्मू-कश्मीरात लवकरच निवडणुका होतील. सावधगिरी म्हणून सरकारने काही पावले उचलली आहेत. जनतेने सहकार्य करावे.
- येथील परिस्थिती हळूहळू सामान्य होईल.
- ईदनिमित्त कश्मिरी जनतेला शुभेच्छा! ईदसाठी सर्वतोपरी मदत करणार.
- लडाख केंद्रशासित प्रदेशच राहणार आहे.
- लडाखचा विकास झपाटय़ाने होईल. येथे उच्च शिक्षण संस्था उभी करू. सोलार जनरेशन केंद्र उभारू. पर्यटनाचा विकास करू!



























































