
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या डेडलाइनला ठेकेदाराकडून ‘तारीख पे तारीख’ मिळत असतानाच यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे. पनवेलपासून पेण, वडखळ, नागोठणे, माणगाव या पट्ट्यात या रस्त्याची चाळण झाली असून जवळपास पाच हजारांहून अधिक खड्डे पडले आहेत. यावर तात्पुरती मलमपट्टी करताना ठेकेदार पेव्हर ब्लॉक, माती टाकून वेळ मारून नेत आहेत. मात्र पुढील 15 दिवसांत ‘माती’ लोटण्याचे काम होणार नसल्याने सणासुदीला जाणाऱ्या कोकणवासीयांचा ‘मोरया’ होणार आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तब्बल आठ वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. डेडलाइन न पाळता रस्त्याचे वाटोळे करणाऱ्या महावीर इफ्रा प्रोजेक्ट या कंपनीचा ठेका सरकारने काढून घेतला व हे काम जे.एम. म्हात्रे इफ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला देण्यात आले. मात्र या ठेकेदार कंपनीलादेखील डेडलाइन पाळण्यात यश आले नाही. आतापर्यंत तीन वेळा काम पूर्ण करण्यासाठी तारखा देण्यात आल्या. त्यातील शेवटची तारीख 16 जून होती, पण पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील अनेक ठिकाणची कामे संथगतीने सुरू आहे. या वर्षी गणेशोत्सवात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता युद्धपातळीवर विविध ठिकाणचे उड्डाणपूल तसेच दुपदरीकरणाची लटकलेली कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात आली. काही अपूर्ण कामे अंतिम टप्प्याच्या दिशेने आहेत, परंतु तीनच महिन्यांत या रस्त्याची पनवेल, पेण, वडखळ, नागोठणे येथे चाळण झाली आहे. धक्कादायक म्हणजे पुलांवरसुद्धा मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वडखळ नाक्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कांदळेपाडा ते डोलवी हा बायपास तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील मुंबई दिशेचा एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र दुसरा मार्ग लटकल्याने खड्ड्यांच्या जंजाळातूनच कोकणात जाणाऱ्या वाहनांना जावे लागत आहे.
पनवेल ते नागोठणे यादरम्यान सर्वाधिक रस्त्याची दुरवस्था झाल्याने गणेशोत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होणार आहे. त्यामुळे या कटकटीतून स्वतःची सुटका करण्यासाठी चाकरमान्यांना पुणेमार्गे आर्थिक भुर्दंड सोसून घर गाठावे लागणार आहे.
न्यायालयाचे आदेश बसवले धाब्यावर
राष्ट्रीय महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसवण्यास बंदी असताना ठेकेदार खड्डे बुजवताना न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत आहे. पेणपासून वडखळपर्यंत बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने पेव्हर ब्लॉक बसवल्याने रस्ता निसरडा झाला असून आपत्कालीन ब्रेक दाबल्यास अपघात होतात. पेण, कांदळेपाडा येथील पुलांवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ताही खचला आहे.



























































