
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर आता मेगा नोकरभरती केली जाणार आहे. विविध सरकारी खात्यांमध्ये 50 हजार जागा रिक्त आहेत. या जागा लवकरच भरल्या जातील, अशी घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली.
राज्यपाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. येत्या सहा महिन्यांत जम्मू-कश्मीरसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. राज्याचा विकास व्हावा ही सरकारची भूमिका असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 50 हजार रिक्त जागांची भरती केली जाणार असून, तरुणांनी याचा लाभ घ्यावा. सरकारी सेवेत दाखल व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
एकाचाही मृत्यू नाही
कश्मीर खोऱ्यात अफवा पसरविण्यात येत आहेत, पण शांतता आहे. काही ठिकाणी आंदोलने झाली पण हिंसाचार भडकलेला नाही. एकाचाही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राज्यपालांनी दिली.
दहशतवाद्यांकडून इंटरनेटचा वापर म्हणून सेवा खंडित
कश्मीरात हिंसाचार भडकविण्यासाठी दहशतवादी आणि पाकिस्तानींकडून मोबाईल फोन व इंटरनेटचा वापर केला जात होता. त्यामुळेच इंटरनेट सेवा खंडित केली. दरम्यान, आता हळूहळू इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.



























































