अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली सिल्लोडची जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट असह्य झाल्याने बाहेर पडलेले अब्दुल सत्तार यांनी सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की “जो मतदारसंघ तुमचा आहे सिल्लोड, तो मला परत जिंकून द्यायची ही जबाबदारी तुमची आहे.” सत्तार यांनी कडवट शिवसैनिक म्हणून मला वचन दिलं आहे की ते आणि त्यांचे शिवसैनिक हे शिवसेना पक्षवाढीसाठी काम करतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पक्षप्रवेशानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जात असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की सत्तार हे गेली अनेक वर्ष या ना त्या कारणाने शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ‘कोणी कुठे जायचं आणि काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतलाय तो संपूर्ण विचार करून घेतला आहे, आणि त्या विचारांचे मी स्वागत करतो.’ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पूर्ण करायला मी तयार आहे. सत्तार म्हणाले की ‘मी काँग्रेसचा आमदार होतो आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आवाज उठवत होतो. ही जबाबदारी खरंतर काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते असतील किंवा काँग्रेसचे इतर आमदार यांची होती. मात्र सत्तेची पर्वा न करता ही जबाबदारी शिवसेनेने पार पाडली.’

भविष्यात शिवसैनिक म्हणून उद्धवजीं मला देतील ती जबाबदारी महाराष्ट्रभर नेत्यांना सन्मान राखत, सर्वांची चर्चा करून पूर्ण करेन असे सत्तार म्हणाले आहेत. मी मराठवाड्यात ऐतिहासिक लीड घेईन आणि निवडून आल्यानंतर पहिले उद्धवजींचे आशीर्वाद घेईन आणि मग सभागृहात प्रवेश करेन असेही सत्तार यांनी सांगितले