
कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा हादरा बसला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला. संभाजीनगर येथे विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सोपवला आहे. जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
भास्कर जाधव यांच्याआधी श्रीवर्धनमधील राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने कोकणातील राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे. भास्कर जाधव यांनी 13 सप्टेंबरला आपण मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी घोषणा केली होती. आपल्यासोबत गुहागर मतदारसंघातील पंचायत सदस्य व 73 सरपंचही शिवसेनेत प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले होते.



























































