
पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. गडकिल्ले भाडय़ाने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. त्यामुळे गडकिल्ले भाडय़ाने द्यायला हरकत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाडय़ाने उपलब्ध करून देण्याच्या भाजप सरकारच्या धोरणाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी समर्थन केले आहे. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाडय़ाने द्यावा, असे म्हटले आहे. मला यात काहीही चुकीचे वाटत नाही. आपण देवळात लग्न लावत नाही का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
किल्ल्यावर छमछमची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा
किल्ल्यावर छमछम करण्याची एवढीच हौस असेल तर चौफुल्याला जा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी भाडय़ाने द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठय़ांचा इतिहास आहे. किल्ल्यावर छमछम आणि बारची एकढीच हौस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा, असा टोला पवार यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला आहे.

























































