
मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाला मेट्रोशी जोडणी झाल्यानंतर होत असलेली कोंडी दूर करण्यासाठी फलाट क्र. 1 वर एलिवेटेड डेकची सुविधा निर्माण करण्याबरोबर 12 मीटर रुंदीचे तीन पादचारी पूल तसेच स्कायवॉकची बांधणी करण्याची योजना मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मदतीने मध्य रेल्वेने आखली असून त्यासाठी सुमारे 50 कोटींचा खर्च येणार आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून मेट्रो धावू लागल्यापासून येथे प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली असून त्याची दखल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेत रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांची कोंडी दूर करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी घाटकोपर स्थानकाला भेट देत मेट्रो प्रशासनाला काही बदल सुचविले होते; परंतु ते पुरेसे नसल्याने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला स्थानकात प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले. त्यानंतर रेल्वे विकास महामंडळाने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या प्रवासी सुविधा वाढीची योजना सादर केली असून त्यास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर (पावसाळा वगळून) सलग 12 महिन्यांत घाटकोपर स्थानकाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम पूर्ण होईल असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. एस. खुराणा यांनी स्पष्ट केले.
घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या क्र. 1 च्या होम प्लॅटफॉर्मवरच 7.5 मीटर रुंदीचा मेट्रो स्थानकाला आणि सर्व पादचारी पुलांशी जोडणी असलेला ‘एलिवेटेड (उन्नत) डेक’ बांधण्यात येणार आहे. स्थानकाच्या उत्तर दिशेला असलेल्या 4 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाला पाडून त्या जागी ‘डबल डिस्चार्ज’चा 12 मीटर रुंदीचा नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या 12 मीटर रुंदीच्या मधल्या पादचारी पुलाच्या उत्तरेला आणखी एक 12 मीटरचा नवा पादचारी पूल बांधण्यात येईल. मेट्रो स्थानकाशी रेल्वे स्थानकाची स्कायवॉकने जोडणी करण्यात येईल. सध्याच्या 6 मीटर रुंदीच्या पालिका पादचारी पुलाशी जोडणी देण्यात येईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
काय आणि कुठे होणार?
- स्थानकाच्या उत्तरेला 4 मीटरच्या जागी 12 मीटरचा डबल डिस्चार्जचा पादचारी पूल
- सध्याच्या मध्यभागी असलेल्या 12 मीटरच्या पादचारी पुलाच्या उत्तरेला आणखी एक 12 मीटर रुंदीचा पूल
- सध्याचा दक्षिण दिशेचा 4 मीटरचा पूल पाडून त्या जागी 12 मीटर रुंदीचा आणखी एक पादचारी पूल
- होम फलाट क्र. 1 वर सर्व पादचारी पुलांना जोडणारा 7.5 मीटर रुंदीच्या ‘एलिवेटेड डेक’ची निर्मिती
- मेट्रो स्थानकाला कनेक्शनसाठी पायऱ्या व रॅम्प
- मेट्रो स्थानकाला स्कायवॉकशी जोडण्याचा प्रस्ताव सध्याच्या पालिका पादचारी पुलाला 6 मीटर रुंदीचे कनेक्शन























































