घाटकोपरमधील श्रीजी टॉवरला भीषण आग,13 जणांची सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

घाटकोपर येथील बारा मजली श्रीजी टॉवरच्या पाचव्या मजल्यावर सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या 13 जणांची अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन सुटका केल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत लताबेन भाटिया ही वृद्ध महिला आणि अग्निशमन दलाचा जवान मिलिंद वारणकर हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळ हा श्रीजी टॉवर आहे. दहा मजली टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील रूम नंबर 501 मध्ये सायंकाळी 6 वाजता आग लागली. लाकडी साहित्य, विद्युत वायर, फ्रीझ, टीव्ही, वॉशिंग मशीन आदी ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली.

त्यामुळे आगीने सहाव्या मजल्यावरील 601 रूमलाही वेढले. यातही घरातील वस्तू जळून खाक झाल्या. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच घबराट पसरली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य हाती घेतले. टॉवरला लागून असलेल्या झाडांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडथळा येत होता. मात्र टॉवरच्या टेरेसवरून 13 लोकांना सुखरूप बाहेर काढले. त्यात दोन दिव्यांग आणि एक वृद्ध महिलेचा समावेश होता.

या दुर्घटनेत लताबेन भाटिया (85) आणि मिलिंद वारणकर (45) हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. धुराचा त्रास झाल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चार फायर इंजिन आणि 3 जम्बो टँकर, 2 पाण्याचे टँकरने रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची टॉवरने अंमलबजावणी केली होती का, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.