
‘जेएनयू’ हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे जोरदार आंदोलन झाले. या आंदोलनात सहभागी एका तरुणीने ‘फ्री कश्मीर’चा बोर्ड झळकवला आणि मग भाजपने याचे राजकारण सुरू केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बोर्डवरून ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र आता ‘फ्री कश्मीर’वरून भाजपला सणसणीत ‘किक’ बसली असून ती तरुणी मुंबईची आहे आणि तो बोर्ड कश्मीर हिंदुस्थानपासून मुक्त करा या मागणीचा नव्हता, तर कश्मीरात केंद्राने जे निर्बंध लादले आहेत त्यापासून कश्मिरी जनतेला मुक्त करा यासाठी होता, असा खुलासा त्या तरुणीनेच केला आहे. महक प्रभू असे त्या तरुणीचे नाव आहे.
‘फ्री कश्मीर’च्या बोर्डावरून देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ‘मंत्रालयापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असा बोर्ड झळकतोच कसा?’ असा सवाल करताच शिवसेना आणि राष्ट्रवादीने फडणवीसांना खणखणीत उत्तर दिले आहे. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करू शकतात? सत्ता गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तुमचा स्वतःवरचा ताबा सुटला आहे की काय, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
भावना समजून घ्या!
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी, ‘फ्री कश्मीर’ फलकाबाबत वेगळा अर्थ काढू नये. कश्मीरमध्ये केंद्राकडून अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तेथील इंटरनेट, मोबाईल सेवा तसेच अन्य विविध सेवा बंद आहेत. या निर्बंधांतून कश्मीरला मुक्त करावे, अशी भावना यामागे असल्याचे सांगितले. कश्मीरला हिंदुस्थानपासून स्वतंत्र करण्याची भाषा कुणी करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
लक्ष वेधण्यासाठी फलक
‘फ्री कश्मीर’चा फलक कशासाठी झळकविण्यात आला हे समजून घेतले पाहिजे. कश्मीरमधील लोकांना ज्या समस्यांना आज तोंड द्यावे लागत आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा फलक दाखविण्यात आला का हे सर्वप्रथम पाहिले पाहिजे. हिंदुस्थानपासून वेगळा करा या उद्देशाने फलक झळकविण्यात आला असेल तर ते निषेधार्ह असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
पोस्टर झळकविणाऱ्या तरुणीचे म्हणणे काय?
मी हिंदुस्थानची नागरिक या नात्याने जेएनयूतील विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे अनेक तरुण वेगवेगळे पोस्टर तयार करत होते. त्यात देशातील विविध प्रश्नांवर पोस्टर तयार केले जात होते. तेथेच ‘फ्री कश्मीर’चे हे पोस्टर होते. ते पाहून माझ्या मनात कश्मीरवर लादलेले निर्बंध आठवले. कारण आम्ही येथे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसाठी जमलो होतो. मागील 5 महिन्यांहून अधिक काळापासून कश्मीरमध्ये अनेक गोष्टींवर बंदी असून व्यवहार ठप्प झाले आहेत. म्हणूनच मी कश्मीरच्या नागरिकांनाही संविधानाने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळावा ही मागणी करण्यासाठी मी ‘फ्री कश्मीर’ हे पोस्टर दाखवले, असे आंदोलक महक प्रभू हिने स्पष्ट केले आहे.




























































