दीपिका ‘आलिया’ची मैत्रिण, बिनडोक असल्याचा अभिनेत्रीचा अप्रत्यक्ष टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या हल्ल्याविरोधात जेएनयूचे विद्यार्थी निदर्शने करत असताना अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या हल्ल्याचा निषेध करत तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला. दीपिकाने विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या आहे. यामध्ये एका अभिनेत्रीने उडी मारली असून तिने दीपिकाला अप्रत्यक्षरित्या बिनडोक म्हटलं आहे.

काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या पायल रोहतगी हिने ट्विटरचा आधार घेत दीपिकावर टीका केली आहे. तिने म्हटलंय की दीपिकाच्या वडिलांनी देशासाठी अनेक पदके जिंकली आणि दीपिका ही देशाला तोडणाऱ्या शक्तींसोबत उभी राहिली आहे.तिने हे सिद्ध केलं आहे की ती आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड आहे. आलिया भट्ट ही तिच्या सामान्य ज्ञानाबाबतच्या अज्ञानामुळे अनेकदा टीकेची धनी झाली आहे. पायलने दीपिकाची तुलना आलियाशी करत ती बिनडोक असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.