भयंकर! पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांची कत्तल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधीही न पाहिलेल्या अशा वणव्याला सामोरं जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाने एक भयंकर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. तिथल्या 10 हजार उंटांची कत्तल करण्याचं ऑस्ट्रेलियाने ठरवलं आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण आणि जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याची भयंकर टंचाई निर्माण झाली आहे. उंटांची ऑस्ट्रेलियात संख्या ही वाढीस लागली आहे. उंटाला प्यायला भरपूर पाणी लागतं. एकीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असताना दुसरीकडे उंटांची संख्या यामुळे अनांगू पितजनजातजारा याकुनीजतजारा या भागात उंटांची कत्तल करण्याचं ठरवण्यात आलं आहे. नळातून येणारं पाणी असो, टाकी असो किंवा अन्य कोणताही जलस्त्रोत उंट पाणी दिसलं की त्यावर तुटून पडतात असं पर्यावरण आणि जलसंपदा विभागाने म्हटलं आहे. पाणी दिसलं की उंट सैरावैरा पळत पाण्याच्या ठिकाणी येतात. यामुळे लहान मुलं, महिला जखमी होण्याची दाट शक्यता आहे असं तिथल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पाण्याचा स्त्रोत 5 किलोमीटर लांब असला तरी उंटांना त्याचा पत्ता लागतो. अनेकदा उंट पाण्यात पडतात आणि तिथेच मरतात. पाण्यात मेलेले उंट कुजतात आणि पाणी दूषित होतं. ज्यामुळे दुर्भिक्षाचा सामना करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडते. या सगळ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उंटांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उंटांना मारण्यासाठी प्रशिक्षित शिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. उंटांना मारण्यासाठी हेलिकॉप्टर बोलावण्यात येणार असून हवेतून उंटांना टीपण्यात येणार आहे. एक आठवडा उंट मारण्याचे अभियान चालवण्यात येणार आहे. यानंतर दोन आठवडे उंटांच्या चिता रचण्यात येणार असून त्यांना जाळण्यात येईल. या उंटांमुळे फक्त पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतंय असं नाही तर हे उंट अन्नधान्याचीही नासाडी करत असल्याचं पर्यावरण विभागच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अनांगू पितजनजातजारा याकुनीजतजारा भागामध्ये दुर्मिळ झाडं आणि वनस्पती आहेत. उंट त्यांचीही नासधूस करत असून ही झाडं आणि वनस्पती नष्ट होण्याचा धोका आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच या उंटांना मारण्याचा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.