
गेल्या अनेक महिन्यांपासून बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अभिनेता प्रभास यांच्यातील कथित प्रेमप्रकरणाबद्दल उलट-सुलट चर्चा होत होती. या दोघांनीही या चर्चेला सतत नकार दिला मात्र तरीही हे दोघे लग्न करणार असल्याच्या अफवा थांबायला तयार नव्हत्या. अनुष्का शेट्टी आता लग्न करणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. ती कोणाशी लग्न करतेय याची अनेकांना उत्सुकता आहे. एक मात्र नक्की आहे की ती प्रभासशी लग्न करणार नाहीये. या वर्षाच्या अखेरीस ती बोहल्यावर उभी राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काही संकेतस्थळांनी अनुष्काच्या लग्नाबाबतची बातमी दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की तिचं लग्न एका दिग्दर्शकासोबत होणार आहे. प्रकाश कोवेलामुदी असं या दिग्दर्शकाचं नाव असून त्याचे वडील राघवेंद्र राव हे देखील तेलुगू चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. हे वृत्त प्रसिद्ध झालं असलं तरी अनुष्का किंवा प्रकाश या दोघांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये.

प्रकाश याने 2004 साली चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. बोम्मलता नावाच्या तेलुगू सिनेमापासून त्याने कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2015 साली त्याने ‘साईझ झिरो’ नावाचा तमिळ आणि तेलुगू अशा दोन भाषांत चित्रपट दिग्दर्शित केला होता.

या चित्रपटामध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत होती. तिथेच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंत्र मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटानंतर या दोघांना एकत्र फिरताना अनेकदा पाहिलं गेलं होतं.प्रकाशचा विवाह अनुष्कासोबत झाला तर त्याचं हे दुसरं लग्न असेल. त्याचं पहिलं लग्न हे हिंदी चित्रपटांची प्रसिद्द लेखिका कनिका धिल्लन हिच्याशी झालं होतं. मात्र नुकतेच ते एकमेतांपासून वेगळं झाले आहेत.

अनुष्का ही आता निष्ब्दम चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात आर.माधवन याची भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे पोस्ट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटामध्ये अनुष्काने बोलता येत नसलेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे.



























































