
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यातील महिलेचे कोरोनाचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. या महिलेला देखील कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी-पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या महिलेमुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 झाली आहे. ज्या महिलेला कोरोना झाल्याचे शनिवारी निदान करण्यात आले ती महिला यापूर्वी शाहूवाडीतच सापडलेल्या तरुण कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली होती. त्याच्यामुळे या महिलेला संपर्क झाल्याचे कळाले आहे.
शाहुवाडी तालुक्यातील एका छोट्या गावातील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं गुरुवारी कळालं होतं. हा तरुण दिल्लीतील निजामुद्दीन भागात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथून गावाला परतल्यानंतर तो आसपासच्या दहा-बारा गावात तो वावरला होता. त्यामुळे त्याच्या गावासह तो ज्या गावांमध्ये गेला होता त्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा तरुण ज्या लोकांच्या संपर्कात आला होता, त्या सगळ्यांची चाचणी घेण्यात आली आहे. शनिवारी ज्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित झालं होतं. तिचीही चाचणी या तरुणाच्या संपर्कात आल्याने घेण्यात आली होती, आणि या चाचणीमध्ये ती पॉझिटीव्ह आढळली आहे. हा तरूण दि.17 मार्च रोजी दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी गेला होता.


























































