इतरत्र अडकलेले 9 हजारांहून अधिक सिंधुदुर्गवासी जिल्हापरतीसाठी इच्छुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले 9 हजार 27 नागरिक जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. तर आपल्या जिल्ह्यातून परजिल्हा व परराज्यात जाण्यासाठी 6 हजार 746 नागरिक इच्छुक आहेत. त्यांनी ऑनलाइन मागणी तशी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशचे 24 विद्यार्थी व हैदराबादचे 18 अभ्यासक आपल्या राज्यात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तसेच राजस्थानमधील 118 मजुरांना परवानगी देण्यात आली आहे, असेही यावेळी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपल्या जिल्ह्यात अडकलेले परराज्य व परजिल्ह्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक व यात्रेकरु यांना जिल्हा सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर जे आपल्या जिल्हयाचे नागरिक असलेले मजूर, पर्यटक, विद्यार्थी व यात्रेकरु दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात अडकले आहेत, त्यानाही जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा लोकांना ऑनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे, असे सांगत मंजुलक्ष्मी यांनी यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकाला जिल्ह्यात यायचे असेल तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सबंधित व्यक्ती ज्या जिल्ह्यात अडकली आहे, त्या जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव पाठविनार आहे. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील अथवा राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेली व्यक्ती आपल्या गावी जाण्यास ईच्छुक असल्यास तशी मागणी ज्या मुळ जिल्ह्यातील ही व्यक्ती आहे तेथील जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठविने आवश्यक आहे. तरच अडकलेल्या लोकांना येण्या जाण्यास परवानगी दिली जाते, असे स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना मंजुलक्ष्मी यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास इच्छुक असलेल्या 9 हजार 27 व्यक्तीनी ऑनलाइन मागणी केली आहे. यामध्ये परजिल्हा व परराज्य येथील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, यात मुंबई सारख्या रेड झोन असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तर इतर राज्यातून येण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती 454 एवढ्या आहेत. यातील 254 व्यक्ती गोवा राज्यात अडकलेल्या आहेत. गुजरात 55, कर्नाटक 47 अशी आकडेवारी आहे. तसेच आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या 6 हजार 746 व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यात किंवा अन्य राज्यात जाण्यास इच्छुक आहेत. महाराष्ट्रसह 16 राज्यांत या नागरिकांना जायचे आहे. मात्र, यातील तब्वल 5 हजार 200 लोकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत जायचे आहे, असे यावेळी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

गोव्यात अडकलेल्या 106 व्यक्तींना आज परत आणणार
गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 254 नागरिक अडकले आहेत. त्यातील 106 लोकांना जिल्ह्यात आणण्यास आपण परवानगी दिली आहे. तसेच गोवा येथून सोडण्यास गोवा सरकारने परवानगी दिली आहे. त्यांना 6 मे रोजी जिल्ह्यात आणण्यात येत आहे. गोवा प्रशासन त्यांना पत्रादेवी येथे आपल्या प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे. तेथे दाखल झाल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास संस्थात्मक क्वारंटाइन किंवा आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

राजस्थान सरकारने पाठविली 1100 लोकांची यादी
राजस्थान सरकारने सिंधुदुर्गात अडकलेल्या त्यांच्या राज्यातील 1100 व्यक्तींची यादी पाठविली आहे. त्यातील केवळ 164 व्यक्तींनी आपल्या राज्यात जाण्यास नोंद केली आहे. मात्र, अन्य नागरिक जिल्ह्यात कामे सुरु झाल्याने एवढ्यात जाण्यास इच्छुक नाहीत. तरीही त्यांच्याशी संपर्क सुरु आहे. उत्तरप्रदेश सरकारने अन्य राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र, सांगेली येथे प्रकल्प अभ्यासासाठी आलेल्या व लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 24 विद्यार्थी व शिक्षक यांना ख़ास बाब म्हणून राज्यात येण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ही मुले आपल्या राज्यात मार्गस्थ झाली आहेत, असे यावेळी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

तहसील कार्यालयात सेंटर कार्यरत
जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु व मजूर यांना आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात जायचे असेल तर त्यांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यांना मोबाईलवर अर्ज भरता येत नसेल तर जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयात याची माहिती देण्यासाठी सेंटर सुरु करण्यात आली आहेत. तेथे जावून माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.