
पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील स्वारगेट स्थानकावरुन गुरूवारी पहिली एसटी बस नगरसाठी रवाना झाली. यात नगर जिल्ह्यातील 16 विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आले. लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध शहरात नोकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे अडकून पडलेल्या नागरीक, विद्यार्थी यांना राज्य परिवहन (एसटी) बसेसमधून त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. गावी जाण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थी, नागरिक यांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवासाची परवानगी दिली जात आहे.
पुणे शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांकडून सातत्याने गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीमुळे या विद्यार्थ्यांचे पोटापाण्याचे हाल होत होते. परिणामी अनेक विद्यार्थी गावी जाण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी स्वारगेट बसस्थानकावर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, घरी गेल्यावर त्यांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ, नये म्हणून जेवणाचे डबे आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. तत्पूर्वी, एसटी महामंडळाकडून एसटी बसची साफसफाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील मास्क वापरत सुरक्षित अंतर पाळले. विद्यार्थ्यांना गावी रवाना करताना स्वारगेट स्थानक येथे विभाग नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक सचिन शिंदे, स्थानक प्रमुख अशोक आघाव आदी उपस्थित होते.


























































