ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या या 6 पैलवानांना भोगावा लागलाय तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्युनियर गोल्ड मेडलिस्ट पहिलवान सागर धनखडच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला ऑलिम्पिकमधील डबल मेडलिस्ट सुशील कुमारचे वादाशी तसे जुनेच नाते आहे. सुशीलसोबत झालेल्या वादामुळेचं योगेश्वर दत्त व बजरंग पुनियासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल छत्रसाल स्टेडियम सोडून गेले होते. नरसिंग यादव व सुशील कुमार यांच्यातील वाददेखील सर्वश्रुत आहे. कुस्तीपटू प्रवीण राणा आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याचा गुन्हादेखील सुशील कुमारवर आहे. मात्र आता थेट सहकारी कुस्तीपटूच्या हत्येमध्येच नाव आल्याने कुस्तीपटू सुशील कुमारच्या कारकिर्दीला काळिमा लागला आहे.

सागर धनखड हा 23 वर्षांचा कुस्तीपटू होता. 4 मे च्या रात्री पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीमध्ये सागरचा मृत्यू झाला होता. घटनेच्या 17 दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी सुशीलला अटक केली होती. सुशील कुमार हा सध्या 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. सुशीलने ऑलिम्पिक स्पर्धेत 2 वेळा पदके जिंकली आहेत. यात एका रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.

ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेले 6 पैलवान असे आहेत ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहेत. यातील 3 जणांची पदके त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. हे पैलवान कोण आहेत ते आपण पाहूयात

पीटर फार्कस
हंगेरीचा रहिवासी असलेल्या पीटरने 1992 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. 1996 साली गांजाची शेती करत असल्याबद्दल पीटरला पकडण्यात आले होते. पीटरला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षेनंतर पीटरने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला पकडण्यात आले. पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पीटरची शिक्षा वाढवून 7 वर्ष करण्यात आली होती. 2014 साली पीटर तुरुंगातून बाहेर आला होता.

टोनी हन्नुला
फिनलंडचा रहिवासी असलेल्या टोनीने 1984 साली त्याने लॉस एंजलिस इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. टोनीला हाणामारी आणि जबरी चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यासाठी त्याला 1989 पासून 2010 पर्यंत तुरुंगवासही भोगावा लागला आहे.

राईमो हिरवोनेन
टोनीप्रमाणेच राईमो हा देखील फिनलंडचा रहिवासी आहे. 1972 सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्याने भाग घेतला होता. त्यालाही टोनीप्रमाणेच हाणामारी आणि जबरी चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती

अलेक्झांडर कोलचिन्स्की
ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कमाई करणारा कुस्तीपटू म्हणून अलेक्झांडरचं नाव घेतलं जातं. 1976 आणि 1980 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ही पदके मिळवली होती. तत्कालीन सोव्हिअत संघाच्या या कुस्तीपटूवर खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. 1996 साली युक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्याला पॅरोल मंजूर केला होता.

डॉक स्ट्राँग
अमेरिकेच्या या पैलवानाने 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. सार्वजनिक ठिकाणी नशा करत असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. 1952 साली डॉकने कोठडीतच आत्महत्या केली होती.

अलेक्सिस विला
1996 साली अटलांटा ऑलिम्पिकमध्ये अलेक्सिसने क्युबाला कांस्य पदक जिकून दिलं होतं. अलेक्सिकस दोन वेळा जागतिक कुस्ती स्पर्धेचा विजेताही झाला होता. फोर्ट लॉडरडेल-हॉलीवुड विमानतळावर दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला 3 वर्षांची शिक्षा झाली होती. 2020 साली त्याला एका खून प्रकरणात 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.