
>> आसावरी जोशी
निसर्गातील अत्यंत जागरूक.. संवेदनशील देवीस्वरूप.. आत्मतत्व सध्या पृथ्वीवर उतरले आहे.. या स्वरूपाचा उत्सव अत्यंत उत्साहात सर्वत्र साजरा होतो आहे.. विविध रूपांत ती अवतरली आहे.. ती दशभुजा आहे.. अष्टभुजा आहे.. कधी सिंहारूढ आहे.. कधी वाघावर आरूढ आहे.. कधी दुर्गा आहे.. कधी गौरी आहे.. कधी सरस्वती आहे.. कधी महालक्ष्मी आहे.. अत्यंत क्रोधीत होऊन शांत झालेली महाकाली आहे.. ही झाली तिची शुभ रूपे.. तिची अनेक रूपे आहेत.. ६४ योगिनी.. १६ मातृका.. हीदेखील तिची शुभ रूपे.. तुम्हाला वाटत असेल आज हिने काय शुभ – अशुभ सुरु केले आहे. देवीचे प्रत्येक रूप हे शुभच असते.. पण आपण माणसे मात्र तिला सुद्धा शुभ – अशुभाच्या चौकटीत बंदिस्त करतो.. पक्ष्यांना करतो.. प्राण्यांना करतो.. अगदी माणसांनासुद्धा करतो.. मग देव तरी या चौकटीतून कसे सुटतील..? अगदी देवीला सुद्धा आपण अशुभाची नावे देऊन पार आहोत.

अलक्ष्मी – हिच्याविषयी जेव्हा माहिती काढत होते तेव्हा इंग्लिशमध्ये हिचे नावं सापडले, “Goddess of misfortune” . मराठीत अलक्ष्मी, दुर्भाग्याची देवता. अशुभ, पाप, दारिद्र्य, वेदना, क्लेश विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे.. आणि तिचे वाहन गाढव असते. समुद्रमंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. आणि धाकट्या लक्ष्मीचा विष्णू देवांबरोबर विवाह होण्यापूर्वी अलक्ष्मीचा विवाह उद्दालक ऋषीबरोबर करावा लागला. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी ही कलीची पत्नी , अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची आणि अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा , मत्सर, क्रोध, अस्वच्छता, अनीती. भ्रष्टाचार, अज्ञान यांची देवता. कलियुगात असत्याबरोबर राहणे अलक्ष्मीला आवडते. ती कृष्णवर्णी, आरक्त नेत्र, द्विभुज, लांब नाकाची मोठे पोट असलेली आहे. केरसुणी हे तिचे आयुध आहे. अलक्ष्मी पिंपळाखाली वसतीला असते.
प्रथा – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्रीनंतर सूप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला घालवून दिले जाते..त्यामुळे लक्ष्मीपूजनाला कर्कश वाद्ये, भयंकर फटाके, मांसाहार टाळावा असा नियम आहे. पश्चिम बंगालमध्ये अश्विन अमावस्येस शेणाची अलक्ष्मी बनवून लक्ष्मी म्हणूनच तिची पूजा करतात, आणि मग तिचे विसर्जन करतात. नांदेड जिल्ह्यातील मुखेड गावातील महादेवाच्या मंदिरात ही देवी पाहायला मिळते. ही अलक्ष्मी म्हणजे एक दुर्मिळ शिल्प आहे. ही ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या हातात केरसुणी आहे. एका हातात सुरा आणि एका हातात कपालपात्र आहे. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाला खाली लोंबते आहे. शेजारी तिचे वाहन गाढव आहे.

सटवाई – ही नवजात बाळांचे भविष्य वर्तवणारी देवता आहे. बाळाच्या जन्माच्या सहाव्या दिवशी सटवाईची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे . तिच्या पूजेच्या ठिकाणी कोरा कागद आणि लेखणी ठेवली जाते. झोपेत हसणाऱ्या बाळाला सटवाई हसवते असाही एक समज आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. ही आडोशाला राहते. तिचे कोणतेही मंदिर नाही. सटवाई देवीचे माहेर लातूर जिल्ह्यात असून तिचा संचार याच जिल्ह्यात असतो. ही देवी भाग्य देवता, आयुष्य देवता, भविष्य देवता या नावानी ओळखली जाते. ” सटीचा लेखाजोखा न चुके ब्राम्हदिका” अशी म्हण आहे. माणसाचे नशीब लिहिणे – पुसणे , आयुष्य वाढविणे – कमी करणे , मनुष्याच्या जीवनात संकटे देणे हे तिचे अधिकार आहेत.
नवरात्रीचा अत्यंत पवित्र सोहळा आहे. देवीचे प्रत्येक रुप मनोहारी आणि मोहक आहे.. पृथ्वीच्या आणि माणसाच्या कल्याणार्थ ती अवतरते.. तरीही ही तिची काही रूपे अशुभ आणि भीतीदायक मानली जातात. असे का व्हावे.. मला असे वाटते, माणसाच्या मनात नेहमीच पाप पुण्याची भीती असते.. आणि पुराणकाळापासून देवाधर्माचा एक अदृश्य धाक आहे.. त्याच्या हातून चुकीचे घडले तर त्याच्याबाबत काही विपरीत होईल ही भीती माणसाच्या मनात कायम असते.. या भीतीतूनच देवतांच्या अशा स्वरूपाचा जन्म झाला असावा.. मुळात देवी ही समस्त सृष्टीची आई आहे.. ती आपल्या लेकरांचे वाईट का करेल.. माणसाचे नशीब किंवा विधिलिखित त्याच्या कर्मावरून ठरत असते. देव फक्त वाट दाखवत असतो.. त्यामुळे मुळात आपली कर्मेच जर उत्तम आणि सकारात्मक केली तर अशा भय देवतांचे अस्तित्वच पुसले जाईल.. व देवीचे कोणतेही रूप मंगलकारीच वाटेल..




























































