
नवरा बायकोमध्ये होणारी भांडणे ही तशी पाहता नित्याची बाब. प्रेमात थोडी भांडणे ही हवीच.. पण ही भांडणे जर रोजची होत असतील तर बाब जरा गंभीर आहे.
तुमच्या नात्याला तुम्ही अधिक वेळ देण्याची गरज आहे. कारण वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. अनेकदा तर मजेमजेत बोललेल्या काही गोष्टीदेखील इतक्या मनावर घेतल्या जातात, की त्यातून गैरसमजच वाढीस लागण्याची शक्यता असते. जर तुम्हाला एक उत्तम पती व्हायचे असेल तर आपल्या पत्नीला आपल्यात काय खटकते हे जाणून घेणं आवश्यक आहे. या गोष्टी मजेतही कधी न करण्याचा सल्ला दिला जातो.
तुला काहीच येत नाही! –
कुणीही प्रत्येक कामात अचूक असू शकत नाही,जर तुम्हाला तुमच्या पत्नीची एखादी गोष्ट आवडत नसेल, तर ते योग्य पद्धतीने सांगा. जर तुम्ही एखादी गोष्ट तुला बिलकूल येत नाही, असं वारंवार म्हणत राहिलात , तर पत्नीला वाईट वाटेलच, शिवाय तिचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा.
इतर महिलांची स्तुती –
चांगले वाईट गुण प्रत्येकात असतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक बाबतीत तुमच्या पत्नीची तुलना इतरांशी करणं योग्य नाही. असं केल्यामुळे पत्नीला दुःख होईलच आणि त्याचं भांडणात रुपांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्नीसमोर शक्यतो इतर महिलांचं कौतुक करणं टाळण्याचा सल्ला अनेकजण देतात.
तिच्या माहेरची निंदा –
पत्नीच्या माहेरच्या मंडळींवर टीका करणे, त्यांना सतत टोमणे मारणे या प्रकारामुळे तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक छोट्यामोठ्या कारणांवरून पत्नीच्या घरच्यांचा उद्धार करणे आणि त्यांना सतत टोमणे मारत राहणे, योग्य नाही. त्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होतात आणि घरातील ताणतणाव सातत्याने वाढत राहतात. आपले घर सोडून आलेल्या पत्नीचे आपल्या माहेरासोबत भावनिक बंध असतात. ते दुखावले जाणं, हे कुठल्याही महिलेला आवडत नाही. त्यामुळे याबाबत बोलतााना शब्द जपून वापरा.
एकत्र घालवा वेळ –
कुठल्याही नात्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असतं. कामाच्या घाईगडबडीत हा वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात निर्माण झालेला दुरावा संपायला संधीच मिळत नाही. आठवड्यातून किमान एक पूर्ण दिवस कुटुंबासाठी रिकामा ठेवणे आणि पत्नीसोबत अधिकाधिक वेळ घालवणे आवश्यक आहे.























































