
>> आनंद म्हाप्रळकर, संचालक, एसजीएम ज्वेलर्स
सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे जुनी आहे. प्राचीन काळी तर सोन्याचे नाणे चलन म्हणून वापरले जायचे. आधीपासून सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघितले जायचे. जुन्या काळातील महिलांकडे भरपूर सोन्याचे दागिने असायचे. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही, असं म्हटलं जातं. सोन्याचे दागिने अंगावर परिधान करता येतात, पण अडचणीच्या काळात ते आपल्याला खूप उपयोगीही ठरतात.
मधल्या काळात लोकांना गुंतवणुकीचे अन्य पर्याय उपलब्ध झाले आणि ते सोन्यापासून लांब गेले. कोरोना काळात सोनं एक सुरक्षित पर्याय म्हणून समोर आला. लोकांना सोन्याचे महत्त्व दिसून आले.
सोने असे ऍसेट आहे, जे महागाईच्या प्रमाणात वाढत आहे. एका अर्थी सोने महागाईविरुद्ध बचाव म्हणून काम करते. महागाईच्या काळात रोख रकमेपेक्षा सोने ही अधिक स्थिर गुंतवणूक असते. सोन्याचे दर का वाढत आहेत, हा लेखाचा स्वतंत्र विषय ठरतो.
छोटय़ा बचतीमधूनही महिला सोन्यात पैसे गुंतवू शकतात. लहान रकमेची बचत करणाऱया महिलांसाठी जास्त मोठी जोखीम घेणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्यासाठी सध्या वेगवेगळे पयार्य उपलब्ध आहेत.
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉव्हरन बॉण्ड हा एक चांगला पर्याय आहे. हे बॉण्ड खरेदी करून त्यावर चांगले व्याज मिळवता येते.
गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक ही शेअर बाजाराशी मिळती जुळती आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करता त्याप्रमाणेच ही खरेदी करू शकता. यामध्ये डिमॅट अकाऊंट उघडणं गरजेचं आहे. यामध्ये ETF ची खरेदी करता येऊ शकते. याची विक्री रोजच्या रोज होत असते.
डिजिटल गोल्ड – केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदीचा हा पर्याय आहे. तुमच्या नावावर दिलेल्या रकमेनुसार डिजिटल सोने निश्चित केले जाते. ते गमावण्याची भीती नसते किंवा विक्रीच्या वेळी पैसे गमावण्याची कोणतीही शक्यता नाही.
तुम्ही प्रत्यक्ष सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट घेऊ शकता.




























































