
शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने १० वर्षीय चिमुकल्याचा आई-वडिलांसमोरच जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पाहून नागरिकांनी डंपरची तोडफोड केली व चालकाला चांगलाच चोप दिला. श्रीपाद पवन कवडे (रा. शिंदे चौक, सोलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे.
पवन कवडे हे मुलगा, मुलगी व पत्नीसह बाळे येथे गेले होते. परत जाताना सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात वळण घेताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर पवन कवडे यांच्यासह त्यांची मुलगी आणि पत्नी बाजूला फेकले गेले. मात्र, श्रीपाद डंपरच्या मागच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. डंपरखाली चिरडून ठार झालेला श्रीपाद हा सोलापूर शहरातील दमानी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता.



























































