मुंबईतल्या टँकर चालकांच्या संपामुळे मेट्रो-कोस्टल रोडच्या कामांवर परिणाम

मुंबईतल्या टँकर चालक-मालकांच्या संपामुळे मुंबईतील मेट्रो रेल्वेपासून कोस्टल रोडचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक़्त करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांनी परिपत्रक जारी करून बोअरवेल्स, ट्यूबवेल्स, विहिरीतून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करण्यावर बंदी घातली आहे. सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त पाण्याचा उपसा करण्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या परिपत्रकाच्या विरोधात मुंबईत टँकर चालक-मालक संपावर गेले आहेत. टँकर चालक-मालकांच्या म्हणण्यानुसार मुंबईत सुमारे दीड ते दोन हजार टँकर विविध सरकारी प्रकल्पांना, इमारत बांधकाम तसेच विविध जिमखान्यांच्या हिरवळीसाठी पाणी पुरवठा करतात. या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत नाही. शिवाजी पार्क मैदानातील हिरवळीवर शिवाजी पार्कमध्ये तयार करण्यात आलेल्या जलपुनर्भरणाच्या माध्यमातून पाणी मारले जाते. त्यासाठी शिवाजी पार्कमध्ये बोअरवेल खणल्या आहेत. त्याच धर्तीवर मुंबईच्या इतर भागांतही खासगी मालमत्तांमध्ये बोअरवेल-टय़ुबवेल तयार केलेल्या आहेत, असा टँकर चालक- मालकांचा दावा आहे.  या बोअरवेल तसेच टय़ुबवेलमधून पिण्याचे पाणी मेट्रो रेल्वेपासून कोस्टल रोडच्या बांधकामांना पुरवले जाते. मुंबईत मोठय़ा प्रमाणावर इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांनाही टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो, पण पोलीस आयुक़्तांच्या परिपत्रकाच्या विरोधात आम्ही संप पुकारल्यामुळे विकास प्रकल्प थांबवण्याची शक्यता आहे, असे मुंबई वॉटर टँकर असोसिएशन व टँकर वॉटर सप्लायर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

पालिकेची भूमिका

मुंबई शहर व उपनगरांत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बोअरवेल, टय़ुबवेल्स व विहिरींमधून पाण्याचा उपसा करून बेकायदा व्यापारी तत्त्वावर वाहतूक होत असल्याबद्दल लोकायुक्तांच्या आदेशावरून पोलीस आयुक्तांनी पत्रक जारी केले आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे.