पंढरपुरात अंत्यसंस्कारानंतर राख आणि अस्थींची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातलं शाश्वत सत्य असतं. माणसाचा मृत्यू झाला की तो सुटला असे म्हटले जाते. मात्र, पंढरपूरमध्ये ‘स्मशानातील सोन्याच्या हव्यासा’पोटी राख आणि अस्थींची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची परवड थांबत नसल्याचे चित्र असून, या घटनेचा पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

एखाद्या व्यक्ती अथवा महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पंढरपुरातील वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.  दुसऱया किंवा तिसऱया दिवशी नातेवाईक जेव्हा राख सावडण्यासाठी आणि अस्थी घेण्यासाठी जातात तेव्हा मृतदेहाच्या अंगावरील सोनं राखेत किंवा अस्थीमध्ये मिसळलं असेल या हव्यासापोटी राख आणि अस्थी चोरीला गेल्याचे समजते. तेव्हा तिसऱयाचा कार्यक्रम कसा करायचा असा प्रश्न नागरिकांना पडतो. राख आणि अस्थी चोरी होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूरमधील वैकुंठ स्मशानभूमीत महिला मृत व्यक्तीची राख चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी राख नेऊन त्यातून सोने काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ही राख तिसऱया दिवसापर्यंत राहात नाही. नगरपालिकेच्या अधिपत्याखाली वैकुंठ स्मशानभूमी आहे. मृतदेह दहन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या अस्थी आणि राख सुरक्षित ठेवणे प्रशासनाचे काम आहे. मात्र, नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रातोरात राख पळविण्याचे प्रकार घडत आहेत.

तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. बुधवारी तिसऱया दिवसासाठी नातेवाईक राख सावडण्यासाठी मोठय़ा संख्येने स्मशानभूमीत पोहोचले तर मृतदेहाच्या अस्थी गायब असल्याचे दिसून आले. राख न मिळाल्याने नातेवाईकांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये राख चोरी झाल्याची तक्रार दिली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.