
रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर दर पाच-सहा मिनिटाला लोकल चालवली जाते. त्यामुळे मोटरमनच्या चुकीमुळे गाडीने लाल सिग्नल ओलांडला तरी दोन गाडय़ांची टक्कर होऊ नये म्हणून रेल्वेकडून अत्याधुनिक अशी ‘एडब्ल्यूएस’ प्रणाली मोटरमनच्या केबिनमध्ये आणि रेल्वे ट्रकमध्ये ठिकठिकाणी लावण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावर शेकडो सिग्नल असून त्याआधारेच लोकल गाडय़ा चालवल्या जातात. मात्र अनेकदा दाट धुके किंवा पावसामुळे मोटरमनला लाल सिग्नल न दिसल्यास अपघात होण्याची भीती आहे. नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दोन लोकल समोरासमोर आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मुंबई विभागात धोक्याची कल्पना देणारी ऍडव्हान्स ऑक्झिलरी सिस्टम बसवण्यात येत आहे. मोटरमन केबिन आणि ट्रकमध्ये एकूण 164 ठिकाणी एडब्ल्यूएस प्रणाली लावण्यासाठी स्पॉट निश्चित केले आहेत.























































