
अभियांत्रिकी पदवीच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने पॅरी ऑनची संधी दिली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील सत्रामध्ये विशेष प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने याबाबत निर्णय घेतला असून उन्हाळी परीक्षा 2023 मधील अभियांत्रिकी विद्याशाखेतील परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर मोठा परिणाम झाला आहे. 40 टक्के विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने नियमांच्या अधीन राहून त्यांना पुढील प्रवेशाची संधी दिली आहे. प्रथम वर्षात नापास असणाऱया विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी किंवा द्वितीय वर्षामध्ये नापास असलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षाच्या सातव्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेण्यात येण्याच्या सूचना प्रभारी कुलसचिव डॉ. सुनील भिरुड यांनी दिल्या आहेत.
याच विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश
द्वितीय सत्र 2023 हिवाळी सत्रातील परीक्षांमध्ये बॅकलॉग विषय पूर्णपणे पास होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय-चौथ्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील अशाच विद्यार्थ्यांचा प्रवेश पुढील सत्रासाठी सुरू ठेवण्यात येईल.
सदर संधीचा लाभ मिळणाऱया विद्यार्थ्यांच्या सत्र 5, 6, 7 व 8 साठी सत्र समाप्तीच्या लेखी परीक्षा एकत्रित उन्हाळी 2024 च्या परीक्षांमध्ये घेण्यात येईल.
ही संधी विशेष बाब म्हणून फक्त शैक्षणिक वर्ष 2023-24 विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच वेळ लागू असणार आहे.
जे विद्यार्थी हिवाळी 2023 मधील परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय वर्षांचे बॅकलॉग पूर्ण करू शकणार नाहीत व प्रचलित नियमानुसार तृतीय व चौथ्या वर्षाच्या पाचव्या-सातव्या सत्राकरिता अपात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांना दिलेला तात्पुरता प्रवेश हा आपोआप रद्द होईल. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडे जमा असलेले शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जाईल.























































