मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे, नवी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते तर पुणे आणि कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात पाऊस पडला. अरबी समुद्रावर वाऱयाची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उत्तरेकडून थंड वारे तर पूर्वेकडून आर्द्रतयुक्त वारे येत असल्याने राज्यात अनेक भागांत पाऊस पडत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक भागांत किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे गारठा वाढल्याचे चित्र आहे. येत्या 24 तासांत राज्यात अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले. रत्नागिरी जिह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सिंधुदुर्गातही पहाटे अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ही पिके फुलोऱयात असल्यामुळे धोक्यात आली आहेत. पुणे ग्रामीण भागातही शेतीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, राज्यात अनेक भागांत 14 ते 15 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे गारठा वाढल्याचे चित्र आहे.
ठिकाण किमान तापमान
(अंश सेल्सियसमध्ये)
नगर 16
अकोला 16
अमरावती 16
संभाजीनगर 15
जळगाव 15
महाबळेश्वर 15
चंद्रपूर 14
गोंदिया 14
वाशीम 14
सांताक्रुझ 21
नंदुरबार 17
नाशिक 17
आंबा अडचणीत
कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आणि आंबा हंगाम जवळ आल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहोर गळून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त असून काजूही धोक्यात आला आहे. नंदुरबार, सोलापूर जिह्यातही अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले.