आमदार नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिनाचा हा अवधी 6 महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन अवधी वाढवण्यास मंजूरी दिली आहे. अतिरिक्त महाधिवक्ता एस.व्ही.राजू यांनी मलिक यांचा जामीन वाढवण्यासास आपली कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेल्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना अटक केली होती. ऑगस्ट महिन्यात जामीन मिळाल्यानंतर ते जवळपास दीड वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले होते.
मलिकांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने अतिरिक्त महाधिवक्ता एस.व्ही.राजू यांना सरकारी पक्षाचे म्हणणे काय आहे असा प्रश्न विचारला. यावर राजू यांनी म्हटले की, ” वाढवला जाऊ शकतो, त्यांनी 6 महिन्यांची वाढ मागितली आहे, आम्हाला यावर कोणतीही आपत्ती नाही” यामुळे खंडपीठाने म्हटले की, ‘याचिकाकर्त्याचा जामीन 6 महिन्यांसाठी वाढवण्यात येत आहे. या प्रकरणाची सुनावणी सहा महिन्यानंतर सूचीबद्ध केली जाईल.’ मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा जामीन मंजूर केला होता. हा जामीन गुणदोषाच्या आधारावर नव्हे तर प्रकृतीच्या कारणास्तव देण्यात आला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये जामिनाचा कालावधी 3 महिन्यांनी वाढवण्यात आला होता.
ईडीने अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली होती. त्याचप्रमाणे दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नागपाडय़ातील दहा मालमत्तांवर ईडीने धाडी घातल्या होत्या. दाऊदचा भाचा व हसीना पारकरचा मुलगा अलिशा पारकर तसेच कुख्यात छोटा शकीलचा साथीदार सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूटस् याचीही ईडीने चौकशी केली होती. या सर्वांच्या चौकशीतून नवाब मलिक यांचे नाव बाहेर आल्यानंतर ईडीने मलिकांवरही कारवाई केली होती.
ईडीच्या चार्जशीटमध्ये काय आहे?
- दाऊदची 200 कोटींची बेनामी संपत्ती मलिक यांनी कमी किमतीत रोखीने विकत घेतली.
- नवाब मलिक यांनी खरेदी केलेल्या या संपत्तीचे मालकी हक्क त्यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे आहेत. मलिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या कंपनीत त्यांचा मुलगा संचालक आहे.
- कुर्ल्याच्या गोवावाला कंपाऊंडमधील या मालमत्तेच्या खऱया मालक मुनीरा आणि मरियम या बहिणी आहेत. ती त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती.
- हसीनाचा साथीदार सलीम पटेल याला त्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. त्यात बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार खान हा सुद्धा होता.
- हसीना पारकर हिने 55 लाख रुपयांसाठी या मालमत्तेचे अधिकार नवाब मलिक यांना हस्तांतरीत केले. मालमत्तेची खरी किंमत 3.3 कोटी होती.