
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवरून मिंधे सरकार आधीच विरोधकांच्या रडावर आहे. आता आणखी एक प्रकार सोलापुरातून समोर आला आहे. आकाश कानडे हे महानगरपालिकेतील निघणाऱ्या वेगवेगळ्या कामांची निविदा भरून कामे मिळवून ठेकेदार म्हणून कामे करतात. सध्या एमआयडीसी हद्दीमध्ये ड्रेनज लाईनचे टेंडर सोलापूर महानगरपालिकेकडून निघालेले होते, आकाश कानडे यांच्यासह इतर 5 जणांनी सदरचे टेंडर भरलेले होते. या ड्रेनेजच्या टेंडरिंगच्या कामावर सोलापूर महानगरपालिकेचे दीपक रामचंद्र कुंभार या इंजिनिअरची देखरेख आहे. याच कामावरून वाद होऊन आपल्याला शिविगाळ, मारहाण करणे आणि धमकावल्या प्रकरणी आकाश यांनी मनिष काळजे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मनिष काळजे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.
आकाश यांनी दिलेल्या माहिती नुसार, 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास इंजिनिअर दीपक रामचंद्र कुंभार यांनी आकाश याला सोबत घेतलं आणि मनिष काळजे यांच्या सात रस्ता येथील ऑफिस मध्ये घेऊन गेले. तेथे मनिष काळजे हे आकाश यांना ‘एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे, किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर 76 लाख रुपये असून, त्याचे 15 टक्के प्रमाणे 11 लाख रुपये तुला मला द्यावे लागतील’, असे म्हणाले. आकाशने त्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी आकाशला दमदाटी व शिवीगाळ करून तुला काम कसे मिळतो ते पाहतो, तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाइ करणार अशी दमदाटी केली. त्यानंतर आकाश तिथून निघून गेले.
02 जुलै 2024 रोजी दुपारी 12:00 च्या सुमारास आकाश महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांचे समवेत सोलापूर महानगर पालिका येथे त्यांच्या विभागाचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे एमआयडीसी सोलापूर येथील वर्क ऑर्डरची निविदा मंजुर झाली का? हे पाहण्यासाठी गेले असताना, तेथे मनिष काळजे यांच्या सोबत असणारा इसम राजेंद्र कांबळे हा तिथे हजर होता. त्यांनी मनिष काळजे यांना आकाश येथे आल्याचा फोन करून सांगितले. त्यावरून मनिष काळजे व त्याचा ड्रायव्हर व एक अनोळखी साथीदार असे तेथे आले. त्यावेळी ते आकाश आणि पेंटर तसेच कुंभार यांच्याशी कामा बाबतीत चर्चा करू लागले. चर्चेदरम्यान आकाश त्यांचे ऐकत नाही याचा राग येऊन त्यांनी आकाशच्या तोंडावर चापटा मारल्या. त्यावेळी दीपक कुंभार यांनी मनिष काळजे यांस ऑफिसमध्ये काही करू नका असे म्हणून बाजुला केले. त्यानंतर मनिष काळजे यांनी, ‘तू MIDC च्या ड्रेनेजची निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉल प्रमाणे मला दे’, असे म्हणून तुला अख्ख्या सोलापुरात राहू देत नाही अशी धमकी दिली. आकाश यांनी त्यास पुन्हा नकार दिला असता, मनिष काळजे यांनी व त्याच्या सोबतच्या ड्रायव्हरने आकाशला शिवीगाळी करून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, म्हणून त्यांच्या विरुद्ध आकाश यांनी तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणात खंडणी आणि मारहाणीची तक्रार दिली असून गुन्हा देखील दाखल झाला आहे अशी माहिती आकाश कानडे यांनी दिली.