
>>> मेघना साने
जागरण, गोंधळ हे महाराष्ट्रीय लोकपरंपरेतील विधिनाट्य समजले जाते. एखाद्या कुटुंबात हळदीच्या दिवशी किंवा लग्न समारंभ झाल्यावर घरी हे कार्यक्रम ठेवले जातात. त्यातून मनोरंजन आणि प्रबोधन होत असते. हे विधिनाट्य सादर करणारे गोंधळी, वाघ्या, मुरळी यांना लोककलावंत म्हटले जाते. अशा एका जागरण, गोंधळ सादर करणाऱ्या कलावंताच्या घरी भारत सातपुते यांचा जन्म झाला, पण आईवडिलांनी त्यांना ‘जागरणा’ला नेले नाही, तर शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. जागरण करायचे तर ते अभ्यासासाठी कर, विद्या मिळवण्यासाठी कर, अशी त्यांची शिकवण होती आणि भारत सातपुते यांनी घरी जेमतेम परिस्थिती असतानाही कष्टाने पदवीधर होऊन आईवडिलांची इच्छा पूर्ण केली. पुढे नोकरी सुरू असतानाच एम. ए. आणि एम. एड. केले. एक उत्तम शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले. हे करताना शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराला कसे तोंड द्यावे लागले हे भारत सातपुते यांनी त्यांच्या ‘जागरण’ या आत्मचरित्रात लिहिले आहे.
‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे’ या उक्तीप्रमाणे शिक्षणक्षेत्रात कशी दलदल माजली आहे हे भारत सातपुते यांना शिक्षक म्हणून रुजू झाल्यावरच कळले. आपल्या पुस्तकाच्या मनोगतात ते म्हणतात, “थोरामोठ्यांची, संतमहात्म्यांची, बलिदानाची, त्यागाची अशी ही भूमी व्यसनाच्या, अंधश्रद्धेच्या, ढोंगीपणाच्या, अनागोंदीच्या विळख्यात गुदमरते आहे हे डोळ्यांना पाहवत नाही.’’
शहराच्या मुख्य भागापासून दूर असलेल्या तालुका किंवा खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची काय स्थिती आहे ती भारत यांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली आणि बहुतेक वेळा त्याबद्दल रिपोर्टही वरिष्ठ मंडळींकडे सादर केला आहे. शाळेत विद्यार्थी संख्येच्या मानाने अपुरे वर्ग असणे, सर्व इयत्तांसाठी जागा नसणे किंवा शिक्षक नेमलेले असून त्यांना स्वतलाच नियमितपणाचे महत्त्व न कळणे, शिक्षकांना तंबाखूसारखे व्यसन असणे, शाळेच्या जागेचा दुसऱ्या गोष्टींसाठी वापर करणे, शासनाने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करणे या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर प्रामाणिक शिक्षक म्हणून सातपुते यांनी आपला आवाज उठवला, परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा लढा व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येणाऱया हीन प्रवृत्तींविरुद्ध होता. मग व्यवस्थेकडून फायदे उकळण्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले होते त्यांनी सातपुते यांच्यावर खोट्या केसेस करायला सुरुवात केली. यात स्त्रियासुद्धा सहभागी होत्या. सातपुते यांचे हे आत्मकथन अत्यंत प्रांजळ आहे ज्यात त्यांनी आपले आत्मपरीक्षणही केले आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांच्या हितासाठी झगडताना त्यांना अनेक कौटुंबिक समस्याही सोडवाव्या लागत होत्या. आईला झालेला दुर्धर आजार, भावाला झालेला रोग, घरच्या शेतीच्या समस्या, कुटुंबापासून दूर राहत असल्याने होणारी ओढाताण याही आघाडय़ांवर लढावे लागत होते. त्यांचे लेखनही सुरू होते आणि शाळेसाठी विविध नवीन उपक्रमही त्यांना सुचत होते. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करताना त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिस्तीकडे लक्ष पुरवले. काही शिक्षक सर्व उपक्रमांत सहभागी व्हायचे तर काही कडक शिस्तीबद्दलच जाब विचारायचे. कधी सरपंच मंडळीही त्यांची नातलग असायची, पण गावात कोणी कोणाचे सोयरे आहेत म्हणून किंवा कोणाची घरची अडचण आहे म्हणून त्यांना शाळेत उशिरा येण्याची सवलत देणे हे भारत सरांच्या शिस्तीत बसणारे नव्हते. विद्यार्थ्यांना वेळ देता यावा म्हणून ते घरापासून दूर असलेल्या शाळेच्या गावी, छोट्याशा खोलीत मुक्कामाला होते. तिथे त्यांना स्वयंपाक करावा लागत असे, पण मुलांना घडवण्यासाठी त्यांना जास्त वेळ देता यावा हा त्यांचा उद्देश होता. पहाटे उठून गावातील मुलांना त्यांनी व्यायामाची सवय लावली. त्यांना पोहणे शिकवले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांशी त्यांनी मैत्री केली आणि पालकांचा विश्वासही संपादन केला.
भारत सातपुते याच काळात कथा, कविता, लेख लिहीत होते. कवी संमेलनांमध्ये कविता सादर करत होते. लेखक म्हणून त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित होत होती. शिक्षणक्षेत्रावरही त्यांनी बरेच लेखन केले आहे. भातांगळी, हरंगुळ अशा गावांतील शाळांचे अनुभव सातपुते यांनी लिहिले आहेत. ‘साक्षरता अभियाना’त समन्वयक प्रतिनिधी म्हणून काम करताना निरनिराळ्या वसतिगृहांना भेट द्यावी लागे. विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास टाळून तेवढा वेळ शिक्षणासाठी देता यावा, गरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने वसतिगृहांच्या सोयी केल्या होत्या. मात्र योजना राबवणारे लोक भ्रष्टाचार करत होते. बऱयाच विद्यार्थ्यांची नावे पटावर दिसत होती. मात्र ती वसतिगृहातच नव्हती. अशा बोगस नावांचा रिपोर्ट शिक्षणाधिकाऱ्यांना देणे, ‘सर्व शिक्षा अभियाना’तील कार्यकर्त्यांसाठी विकत घेतलेल्या सायकल खरेदीतील भ्रष्टाचार, परीक्षेदरम्यान कॉपी करण्यासाठी मिळणारी खुद्द शिक्षकांची साथ… अशा अनेक गोष्टी त्यांनी रिपोर्ट केल्या. अनेकांचे रोष ओढवून घेतले. ‘माणुसकी’ची चौकट भक्कम होण्यासाठी भारत सातपुतेंनी खडतर ‘जागरण’ केले आणि अशा ‘जागरणा’ची आवश्यकता असल्याचे या आत्मचरित्रातून दाखवून दिले आहे.