परीक्षण – ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांचे भावपूर्ण निरूपण

<<< राहुल गोखले

आषाढी एकादशी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या वारीचा सोहळा अद्भुत असाच असतो. ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात आणि भागवतधर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन वाटचाल करीत लक्षावधी वारकरी आळंदी आणि देहूहून पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पोचतात. गेली सातशेहून अधिक वर्षे ‘ज्ञानेश्वरी’चे गारुड मराठी मनावर आहे. भगवद्गीतेवर संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला टीकात्म ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ दीपिका’ किंवा ‘ज्ञानेश्वरी’. भगवद्गीता श्रीकृष्णाने दिग्मूढ झालेल्या अर्जुनाला उद्देशून सांगितली ती रणांगणावर. शिवाय ती संस्कृतमध्ये. संत ज्ञानेश्वरांनी ती प्राकृतात आणली. या महान ग्रंथाचा संदेश विश्वात्मक. तो समजून घेण्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांचे रसाळ निरूपण करणाऱयांची आवश्यकता असते.

उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे कृष्णा जाधव यांनी ‘एक तरी ओवी’ या पुस्तकातून 101 प्रकरणांतून ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांचे निरूपण केले आहे. पुस्तकाला बाबामहाराज सातारकर यांची प्रस्तावना लाभली आहे. ते म्हणतात, लेखकाने ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’मधील अध्याय एक ते सहामध्ये मांडलेल्या ओव्यांमधील ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याबद्दल अतिशय सुंदर निरूपण केले आहे. सातारकर यांचा हा अभिप्रायच पुस्तकाचे वैशिष्ट्य अधोरेखित करतो.

लेखकाने ‘ज्ञानेश्वरी’तील ओव्यांचे निरूपण करताना त्यातील मर्म मांडले आहेच. मात्र त्याबरोबरच निगडित विविध माहिती लेखकाने ओघात दिली असल्याने या निरूपणाची खुमारी वाढली आहे.

गीतेच्या पहिल्या श्लोकाचे विवेचन करताना ज्ञानेश्वर महाराज ‘तरी पुत्र स्नेहे मोहितु; धृतराष्ट्र असे पुसतु’ असे लिहितात तेव्हा त्यातील ‘तरी’ या शब्दातून कोणता भाव निर्माण होतो याचा खल लेखक नेमकेपणाने करतात. भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ या श्लोकात मांडण्यात आलेले तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर माऊली ‘परि कर्मफळी आस न करावी’ या ओवीतून कसे सुलभ, सोप्या पद्धतीने, मात्र तरीही सटीकपणे मांडतात याकडे लेखक लक्ष वेधतात.

गीतेतील अठरा अध्यायांमधील सातशे श्लोकांवर ज्ञानेश्वर माऊलींनी नऊ हजार ओव्यांचे ‘भावकमल’ रचले असे वर्णन लेखक करतात. रणांगणावर आपलेच आप्तेष्ट पाहून अर्जुन दिग्मूढ झाला त्याचे वर्णन करताना ‘ज्ञानेश्वरी’मधील ‘तेथे मनी गजबज जाहली; आणि आपैसी कृपा उपजली’ या ओवीचे निरूपण करताना लेखक ज्ञानेश्वरीतील दृष्टांतांकडे लक्ष वेधतात. ते करतानाच पांडवांच्या सैन्यात सात औक्षोहिणी, तर कौरवांच्या सैन्यात अकरा औक्षोहिणी होत्या अशी माहिती देतात. मात्र त्यावरच न थांबता लेखक एका औक्षोहिणीत असणाऱ्या रथांच्या, हत्तीच्या, घोडेस्वारांच्या, पायदळाच्या संख्येतील आकड्यांची बेरीज अठराच कशी होते, हे उलगडून सांगतात. महाभारताचे युद्धदेखील अठरा दिवस चालले. अठरा प्रकारांचे बाण त्यात वापरण्यात आले. गीतेचे अध्याय अठरा आणि महाभारतात असणाऱ्या पर्वाची संख्या अठरा, हा अनोखा योगायोग लेखक निरूपणाच्या ओघात उलगडून दाखवितात. दृष्टांत हा ‘ज्ञानेश्वरी’चा अलंकार. ‘ज्ञानेश्वरी’ची भाषा अतिशय मधुर. त्याचे अनेक दाखले लेखकाने पुस्तकात दिले आहेत.

 एक तरी ओवी

लेखक ः कृष्णा जाधव

प्रकाशक  ः नवचैतन्य प्रकाशन, मुंबई