
<<< अस्मिता येंडे
गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात गोनीदा हे एक अनुभवसंपन्न, सर्जनशील कलावंत व लेखक होते. कादंबऱ्यांसोबतच त्यांनी धार्मिक, पौराणिक, दुर्गभ्रमंतीवरही लेखन केले आहे.
या साहित्यकृतींमधील ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या प्रवासवर्णनात्मक कादंबरीत कमी वयात वैधव्य आल्यामुळे आपल्या वडिलांच्या सोबत राहून, पाठशाळेतील मुलांना सुयोग्य संस्कार व शिक्षण देऊन दारी येणाऱ्या नर्मदा परिक्रमावासींची मनोभावे सेवा करणारी वात्सल्यपूर्ण यशोदा.
या व्यक्तिरेखेविषयी लेखक सुनील पांडे यांनाही उत्सुकता निर्माण झाली. या कादंबरीतील यशोदा या पात्राचे वर्णन वाचून, या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ‘एक होती यशोदा’ ही छोटेखानी कादंबरी लिहिली. या कथानकाचा परीघ जरी लहान असला तरी त्यातील आशय आणि मानवी मनाचा आलेख व्यापक आहे. वयाच्या 13व्या वर्षी चित्तशुद्धीसाठी घरातून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी सतत भ्रमंती करणारे भैया नर्मदा परिक्रमा करता करता यशोदेकडे आश्रयाला येतात. ते आजारी असतात त्या दिवसांमध्ये यशोदा भैयांची मनोभावे सेवा करते. या दिवसांत जो सहवास एकमेकांना लाभतो, त्यात बरेच सुंदर प्रसंग निर्माण होतात. त्यांच्या संवादातून यशोदा आणि भैयामधील फुलणारा स्नेहभाव सुंदर रीत्या लेखकाने फुलवला आहे.
एके दिवशी यशोदा भैयाला नर्मदा परिक्रमेस जाण्यास सांगते. भैया कोणताही प्रश्न न विचारता घरातून बाहेर पडतात. तो विरहाचा प्रसंग घडल्यानंतर यशोदेच्या मनात काय सुरू असेल, तिच्या मनाला कशाची हुरहुर लागली असेल, याची कल्पना करून लेखक सुनील पांडे यांनी ‘एक होती यशोदा’ ही कादंबरी लिहिली. मूळ कादंबरीच्या आशयाला धक्का न लावता स्त्राr-पुरुष नात्यातील सीमारेषा संवेदनशील भावनेने लेखकाने या कादंबरीतून प्रकाशमय केली आहे. एकमेकांच्या आत्मसन्मानाला धक्का बसू नये म्हणून एकमेकांसाठी प्रयत्न करणारे भैया आणि यशोदा यांच्यातील नात्यांपलीकडील स्नेहभाव लोभसवाणे आहे. या कादंबरीला डॉ. वीणा देव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. सुहास लिमये यांनी अभिप्राय दिला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे. तसेच ज्येष्ठ संपादक, कवी-लेखक श्रीराम पचिंद्रे यांनी पाठराखण केली आहे.
एक होती यशोदा
लेखक ः सुनील पांडे प्रकाशक ः सकाळ प्रकाशन
किंमत ः 125 रुपये