
<<< अश्विन बापट
शेतकऱ्याला जोडधंदा उपलब्ध व्हावा, महिला उद्योजक निर्माण व्हाव्यात या हेतूने सोलर ड्रायरची संकल्पना अधोरेखित केली. या संकल्पनेनुसार सुमारे 400 महिला शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय. नाशिकच्या मोहाडीचे गणेश कदम यांनी फुलवली द्राक्षांची कारकीर्द.
नाशिकच्या मोहाडीचा एक शेतकरी, ज्याने द्राक्षशेतीची कास धरून आपली कारकीर्द फुलवली. त्याच वेळी इतरांच्या संसाराची मुळं घट्ट करताना, अर्थात त्यांना रोजगार निर्माण करून देताना सामाजिक योगदानही दिलंय. मी बोलतोय मोहाडीच्या गणेश कदम यांच्याविषयी.
“या वाटचालीची बीजं कशी रोवली?” असं विचारलं असता ते म्हणाले, मी नाशिकच्या मोहाडीचा. 2004 ला हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं. वडील एचएएलमध्ये होते. ते ओझरला कार्यरत होते, तर शेती मोहाडीमध्ये होती. त्या वेळी बँकेचं कर्ज काही नियमांमुळे मिळत नव्हतं. तेव्हा चरितार्थ चालवण्यासाठी शेती विकण्याची वेळ येऊ द्यायची नाही म्हणून मी द्राक्षशेतीला सुरुवात केली. वडिलांच्या अगोदर 10 एकर जागेतली द्राक्ष बाग मी आता 13 एकरपर्यंत वाढवलीय, ज्यामध्ये वर्षाला 700 ते 800 क्विंटल द्राक्ष उत्पन्न आम्ही घेतो.
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचा भाग म्हणून आम्ही मा. विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुरू केली आहे. आम्ही संचालक आणि शेअरहोल्डर म्हणून या कंपनीशी जोडले गेलोय.
मोहाडी परिसरातील नऊ गावांमधील 400 शेतकरी आमच्याशी जोडले गेलेत, ज्यामध्ये सर्वच्या सर्व या महिला शेतकरी आहेत. त्यांना या शेती व्यवसायाकरिता प्रेरित करतानाच सोलर ड्रायरची संकल्पनाही आम्ही त्यांना समजावली आणि कार्यान्वित करायला लावली.
शेतकऱ्याला जोडधंदा उपलब्ध व्हावा, महिला उद्योजक निर्माण व्हाव्यात या हेतूने आम्ही सोलर ड्रायरची संकल्पना अधोरेखित करत आहोत. या संकल्पनेनुसार काम करून सुमारे 400 महिला शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय. या माध्यमातून कसुरी मेथी, कोथिंबीर, पुदिना, पालक, गाजर, कोबी, टोमॅटो, कांदा अशी पिकं घेतली. मनुके, सफेद, लाल आणि काळे मनुके यांचंही उत्पादन आम्ही घेतलंय. मागच्या सहा महिन्यांत अंदाजे दीड कोटी रुपये उत्पन्न आम्ही या माध्यमातून घेतलंय.
आम्ही केवळ शेतकरी म्हणून या महिलांना स्वयंपूर्ण करत नाही, तर त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर बनवतो. ज्यायोगे कोणत्याही आव्हानाला, अडचणीला त्या समर्थपणे सामोरं जाऊ शकतील. याकरिता ख्यातनाम मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींच्या आयपीएच या संस्थेमार्फत या महिलांना मार्गदर्शन केलं जातं.
बाजाराच्या गरजा समजून घेत तसा पुरवठा करणं हे महत्त्वाचं सूत्र आहे. क्वालिटी, क्वान्टिटी आणि कन्सिस्टंसी या तिन्ही बाबी या वाटचालीत मोलाची भूमिका बजावतात. हे आमच्या शेतकऱ्यांच्या मनावर ठसवणं फार गरजेचं आहे. आम्ही मार्गदर्शनपर सत्रांमधून मानसिक सुदृढतेसोबतच याही गोष्टींवर आमच्याकडे भर देत असतो. द्राक्षाचं कसदार पीक घेण्यासोबतच सकारात्मकता पेरण्याकडे आमचा कल आहे, असंही गणेश यांनी गप्पांच्या सांगतेच्या वेळी सांगितलं.
(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोड्युसर-सीनियर न्यूज अँकर आहेत.)