पश्चिमरंग – रॉन्डो म्युझिकल फॉर्म

<<< दुष्यंत पाटील

संगीत रचनेमध्ये एकाच वेळी विविधता असणं आणि एकसमान धागाही असणं हे म्युझिकल फॉर्ममुळं शक्य होतं. बरॉक कालखंडापासून वापरात असणारा एक म्युझिकल फॉर्म म्हणजे ‘रॉन्डो’ (Rondo). या म्युझिकल फॉर्मच्या वापराची सुरुवात एका प्रकारे युरोपमधल्या लोकगीतांमधूनच दिसून येते.

आपली संगीत रचना छोटी असो व मोठी, ती ऐकताना श्रोत्यांचं लक्ष कसं वेधून ठेवता येईल याचा विचार प्रत्येक संगीतकाराला करावा लागतो. आपण मागे पाहिलंच की, संगीत रचनेत तीच तीच थीम सारखी येत असेल तर संगीत रचना कंटाळवाणी होते. ती कंटाळवाणी होऊ नये यासाठी संगीतकारांना आपल्या संगीत रचनेत विविधता ठेवावी लागते, पण एखाद्या रचनेत येणाऱ्या थीम्समध्ये खूपच विविधता असेल आणि श्रोत्यांना त्यात काही समान धागाच सापडत नसेल तर श्रोते पूर्णपणे गोंधळून जातील. त्यामुळे एखादी संगीतरचना लक्ष वेधून ठेवणारी असण्यासाठी त्यात एकसमान असणारा धागाही असायला हवा आणि त्यात विविधताही असायला हवी.

आपण मागेच पाहिल्याप्रमाणे संगीत रचना कंटाळवाणी किंवा गोंधळात टाकणारी होऊ नये यासाठी संगीतकार मंडळी ‘म्युझिकल फॉर्म’चा वापर करतात. ‘म्युझिकल फॉर्म’ म्हणजे संगीत रचनेचा आराखडा. संगीत रचनेमध्ये एकाच वेळी विविधताही असणं आणि एकसमान धागाही असणं हे म्यझिकल फॉर्ममुळं शक्य होतं. संगीत रचनेतली विविधता आणि एकता यांचा समतोल म्युझिकल फॉर्ममुळेच साधला जातो.

म्युझिकल फॉर्मचे बरेच प्रकार आहेत. बरॉक कालखंडापासून वापरात असणारा एक म्युझिकल फॉर्म म्हणजे ‘रॉन्डो’ (Rondo). ‘रॉन्डो’ हा शब्द असाच उच्चार असणाऱ्या Rondeau या फ्रेंच शब्दापासून आला आहे. मूळ फ्रेंच शब्द हा कवितेचा एक प्रकार आहे. या प्रकारच्या कवितेत सुरुवातीला येणारी ओळ कवितेच्या मध्ये काही वेळेला आणि कवितेच्या शेवटी येते. अर्थातच कवितेत तर ओळीच असतात, पण पुन: पुन्हा येणाऱ्या ओळीचं खास महत्त्व असतं. संगीतातला ‘रॉन्डो’ म्युझिकल फॉर्म हाही असाच असतो. यात सुरुवातीला एक म्युझिकल थीम येते. ही थीम संगीत रचनेत पुन: पुन्हा येत असल्यानं या थीमला ‘प्रिंसिपल थीम’ असंही म्हणतात. याशिवाय ‘रॉन्डो’ म्युझिकल फॉर्म असणाऱ्या रचनेत इतरही थीम्स येतात. या थीम्सना ‘सेकंडरी’ थीम्स म्हणतात.

संगीत रचनेत सुरुवातीला आलेल्या प्रिंसिपल थीमनंतर एक सेकंडरी थीम येते. मग पुन्हा प्रिंसिपल थीम येते आणि नंतर वेगळीच सेकंडरी थीम येते. शेवटी पुन्हा एकदा प्रिंसिपल थीम येते. थोडक्यात सांगायचं तर ‘रॉन्डो’ म्युझिकल फॉर्ममध्ये ‘अ – ब – अ – क – अ’ असे भाग येतात. ‘अ’ या भागातली थीम पुन: पुन्हा येत असल्यामुळे अखंड संगीत रचनेत एकता असल्याचा अनुभव श्रोत्यांना येतो. त्याच वेळी वेगवेगळ्या सेकंडरी थीम्स येत असल्यामुळे संगीत रचनेत विविधताही येते.

‘रॉन्डो’ म्युझिकल फॉर्मच्या वापराची सुरुवात एका प्रकारे युरोपमधल्या लोकगीतांमधून दिसून येतो. या लोकगीतांमध्ये गीतातल्या प्रत्येक कडव्यानंतर मुख्य थीम असणाऱ्या ओळी कोरसमध्ये गायल्या जायच्या. कडव्यांमधले शब्द बदलत असले तरी कोरसमध्ये गायल्या जात असणाऱ्या मुख्य ओळी त्याच असायच्या.

‘रॉन्डो’ फॉर्मचे दोन प्रकार आहेत – साधा ‘रॉन्डो’ फॉर्म आणि क्लासिकल ‘रॉन्डो’ फॉर्म. साधा ‘रॉन्डो’ फॉर्म ‘अ – ब – अ – क – अ’ असा किंवा ‘अ – ब – अ – क – अ – ब – अ’ असाही असू शकतो. ‘अ – ब – अ – क – अ – ब – अ’ या प्रकारात ‘ब’ ही सेकंडरी थीम दोनदा येते, तर ‘अ’ ही प्रिंसिपल थीम एकूण पाचवेळा येते. प्रिंसिपल थीम आणि सेकंडरी थीम आळीपाळीनं येण्याचा नियम मात्र इथेही पाळला जातो. नंतरच्या काळात या फॉर्ममध्ये बदल होत गेले. हा फॉर्म अधिकाधिक क्लिष्ट होत गेला. बदल झालेल्या या फॉर्ममध्ये येणारी प्रिंसिपल थीम (काही वेळेला सेकंडरी थीम्ससुद्धा) ही स्वतःच आपण पूर्वी पाहिलेल्या बायनरी किंवा टर्नरी फॉर्ममधली एक स्वतंत्र रचना असायची. ‘रॉन्डो’ फॉर्मचा हा क्लिष्ट असणारा प्रकार ‘क्लासिकल रॉन्डो’ फॉर्म या नावानं ओळखला जातो.

बीथोव्हनची ‘फ्युअर एलिझा’ ही विश्वविख्यात रचना ‘रॉन्डो’ फॉर्म वापरून केली गेली आहे. (यातली प्रिंसिपल थीम आपण कधी ना कधी ऐकलेलीच असते. बऱ्याचदा ही थीम कारच्या रिव्हर्स गिअरच्या संगीतात वाजते. याच रचनेचं प्रत्यक्षात पियानोवर वाजवलेलं संगीत कित्येक पटींनी मधुर ऐकू येतं.) या रचनेत ‘अ-ब-अ-क-अ’ असे भाग आपल्याला स्पष्ट जाणवतात. ‘रॉन्डो’ फॉर्म पाहण्यासाठी आपण यूट्युबर `Beethoven Fur Elise’ असा सर्च करून ती संगीत रचना ऐकू या.

[email protected]