
लग्नाच्या मेन्यूमध्ये नॉनव्हेज ठेवले नाही म्हणून नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया परिसरात ही घटना घडली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.
अभिषेक शर्मा या तरुणाचा देवरियातील आनंद नगर गावातील सुषमा नामक तरुणीशी विवाह ठरला होता. त्याप्रमाणे 11 जुलै रोजी अभिषेक वरात घेऊन सुषमाच्या घरी आला. लग्न पार पडल्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी जेवायला गेली.
जेवणाच्या मेन्यूमध्ये पनीर, पुलाव, विविध प्रकारच्या कढी असे शाकाहारी पदार्थ होते. शाकाहारी पदार्थ पाहताच नवऱ्याकडील लोक चिडले. मांसाहारी जेवण ठेवले नाही म्हणून वरपक्षाकडील लोकांनी वाद घातला.
नवरदेवाने नवरीला लग्नात जेवण काय ठेवले असे विचारले. नवरीने शाकाहारी जेवण असल्याचे सांगताच नवरदेवाने तिच्या कानशिलात लगावली. यानंतर नवऱ्याकडील लोकांनी वधूच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. यानंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.
दोन्ही पक्षांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात वधू पक्षातील सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नवरदेवासह काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.