आणखी एक घोटाळा! रस्त्यांसाठी पुन्हा सहा हजार कोटींच्या निविदेचा घाट, आदित्य ठाकरे यांनी बिंग फोडले

मिंधे आणि भाजपकडून कंत्राटदार मित्रांसाठी मुंबईकरांच्या पैशांची लूट चालली असून रस्त्यांसाठी पुन्हा एकदा सहा हजार कोटींच्या निवेदेचा घाट घातला जात असल्याचे बिंगच शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडले आहे. हा घोटाळा आम्ही उघड करणारच आहोत, पण त्यापूर्वी आधीच्या 6 हजार 80 कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले, घोटाळेबाजांवर काय कारवाई केली ते सांगा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमातून पालिकेतील नव्या रस्ते निविदा प्रक्रियेचा पर्दाफाश केला आहे. पालिका आता 6 हजार कोटींच्याही वर जाऊन अधिकच्या खर्चासाठी निविदा काढणार आहे. मात्र आम्ही आणखी एक घोटाळा उघड करण्यापूर्वी आधीच्या घोटाळ्यातील दोषींवर काय कारवाई केली हे पालिकेने स्पष्ट करावे, असे आदित्य यांनी नमूद केले आहे. 2023-24च्या रस्त्यांची खरी स्थिती काय, हे पालिकेने स्पष्ट करावे, असे आवाहन करतानाच भाजप-मिंधे राजवटीच्या कंत्राटदार मित्रांसाठी बीएमसी मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही, असेही ठणकावले आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसाठी मुंबई म्हणजे एटीएम

गेल्या 2 वर्षांपासून बीएमसी थेट घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्याकडून चालवली जात आहे. मुंबईचे 100 कोटी रुपये रेसकोर्सवरील खासगी मालकीच्या घोडय़ांच्या तबेल्यांवर खर्च करण्याच्या मूर्खपणाला बीएमसीने मान्यता दिली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचे ‘एटीएम’ म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी आमची मुंबई आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणं आमच्या रक्तातच आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

असे आहे प्रकरण

मिंधे सरकारने पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत शहरातील सर्व रस्ते एकाच वेळी सिमेंट काँक्रिटचे करण्याचा घाट घातल्यामुळे कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने गेल्या सवा वर्षात चौथ्यांदा निविदा मागवण्याची वेळ आली आहे.  यातच मिंधे सरकारच्या कॉण्ट्रक्टर मित्रांच्या  फायद्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून रस्ते कामात होणारा घोटाळा आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. यानंतर कॉण्ट्रक्ट रद्द करण्यात आले होते. यानंतर शहरातील रस्ते कामासाठी तब्बल 300 कोटी कमी दराने निविदा काढण्यात आल्या होत्या.

या प्रश्नांची उत्तरे द्या!

n 6080 कोटींचा घोटाळा आम्ही उघड केल्यानंतर 2022मध्ये पालिकेने रस्ते कामाच्या या निविदाच रद्द केल्या. मात्र ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केलाय, काम सुरू केले नाहीये त्यांच्यावर काय कारवाई केली? या घोटाळ्यातील आणि त्यापूर्वीच्या काळ्या यादीतील पंत्राटदारांचे काय झाले?

n जानेवारी 2023च्या निविदेची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही? जानेवारी 2023च्या निविदा घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱयांवर कारवाई झाली का?

लवकरच स्थापन होणारं आमचं सरकार या सर्व कामांना स्थगिती तर देणारच आहे. शिवाय या घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबवणार आहे. शिवाय या घोटाळ्यांची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल.