राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ चिन्ह गोठवलं

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ हे चिन्ह गोठवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे.

अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आणि मतांचे विभाजन, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला होता. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे धाव घेत ‘पिपाणी’ या चित्रावर आक्षेप नोंदवला होता. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने निकाल दिला असून ‘पिपाणी’ हे चिन्ह गोठवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष या चिन्हावरच निवडणूक लढेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ‘घड्याळ’ हे चिन्हे अजित पवार गटाला, तर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्हे देण्यात आले. ‘तुतारी वाजवणारा माणूस’, ‘पिपाणी’ आणि फक्त ‘तुतारी’ ही चिन्हे जवळपास सारखीच वाटत असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

त्यामुळे लोकसभा निवडणूक संपताच याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला होता. यावर निवडणूक आयोगाने आता निर्णय दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यास दुजोरा दिला असून निवडणूक आयोगाचे पत्रक त्यांनी वाचून दाखवले आहे.

रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा! नीलेश लंके यांची टीका

जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने 16 जुलै 2024 ला काढलेले पत्रक दाखवले. तसेच या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दि. 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसुचनेतील परिशिष्ट 3 मधील अनुक्रमांक 172 वरील ‘बिगुल’ (पिपाणी) आणि अनुक्रमांक 173 वरील ‘तुतारी’ ही मुक्त चिन्ह गोठवण्यात येत आहेत असे पत्रक राज्य निवडणूक आयोगाने काढल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

अजित पवार गटाला पिंपरीत खिंडार, गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश