सोसायटीच्या मिटिंगमधील वाद विकोपाला; अध्यक्षाने चावा घेत सदस्याचा अंगठाच तोडला!

सोसायटीच्या मिटिंगमध्ये झालेल्या वादातून अध्यक्षाने सदस्याच्या अंगठ्याचा चावा घेत हातापासून वेगळा केला. मुंबईतील दहिसर परिसरातील मात्रेवाडी येथे अमरनाथ सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. आदित्य देसाई असे जखमी सदस्याचे तर नित्यानंद परिहार असे आरोपी अध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दहिसर पश्चिमेला असलेल्या अमरनाथ सोसायटीची मासिक सभा रविवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या सभेत सोसायटीतील विविध समस्यांवर चर्चा सुरु असतानाच सदस्य देसाई आणि अध्यक्ष परिहार यांच्यात वाद झाला. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला.

परिहार यांना राग अनावर झाला आणि त्यांनी देसाई यांचा अंगठाच चावून हातावेगळा गेला. यानंतर देसाई यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारानंतर देसाई यांनी घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.