
गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्याला तब्बल 46 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यासाठी अख्खे मंत्रिमंडळ मराठवाड्यात आले होते. घोषणा करून मिंधे सरकार पळून गेले. वर्षभर सरकारने मराठवाड्याला तोंड दाखवले नाही. 46 हजार कोटींमधले 46 पैसेही मराठवाड्याच्या वाट्याला अद्याप आले नाहीत. मग हा सगळा पैसा गेला कुठे? मराठवाड्याच्या हक्काचा हा पैसा मिंधे सरकारने निलाजरेपणाने लाडकी बहीण योजनेत वळवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वाट पाहून डोळे शिणले
वेगवेगळ्या विकास योजनांसाठी मिंधे सरकारने 46 हजार कोटी रुपयांचे जाहीर केलेले पॅकेज पाहून मराठवाडा हरखून गेला. विकासाची गंगा मराठवाड्याच्या दारी आली असे चित्र निर्माण झाले. परंतु हे गाजर होते, हा जुमला होता हे वर्षअखेरीस समोर आले. जाहीर करण्यात आलेल्या 46 हजार कोटींपैकी साधे 46 पैसेही हे सरकार देऊ शकले नाही. अर्थसंकल्प जाहीर करण्याअगोदर मराठवाड्याला देऊ करण्यात आलेल्या पॅकेजच्या संदर्भात थोडीफार हालचाल झाली. पण पैसा काही आला नाही.
मिंधे सरकारने मारलेल्या थापा
राजधानी दिल्लीत स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार, त्यावर 14 हजार कोटींचा खर्च पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी 105 कोटी वैजापूरच्या शनीदेवगावला 285 कोटी खर्चुन बंधारा वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासाठी 156 कोटी तुळजाभवानी मंदिरासाठी 1328 कोटी
औंढा नागनाथ मंदिरासाठी 60.35 कोटी सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर देवस्थानसाठी 45 कोटी पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी 91 कोटी मानव विकास अंतर्गत बसेससाठी 38 कोटी अंगणवाडी विकासासाठी 386 कोटी दगडाबाई शेळके स्मारकासाठी 5 कोटी
मुक्तिसंग्रामाचाही घोर अपमान
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मिंधे सरकारने मोठ्या बाजारगप्पा मारल्या. देशाची राजधानी दिल्लीत मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सरकारने केली. मुक्तिसंग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी देण्यात आले. महिला स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याचबरोबर मुक्तिसंग्रामाशी निगडित अनेक योजनांसाठीही मुबलक पैसा देणार असल्याची थाप मिंधे सरकारने मारली. मात्र वर्षभरात एकही पैसा हे सरकार देऊ शकले नाही. थापेबाज सरकारने मुक्तिसंग्रामाचाही घोर अपमान केला.